सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर सोमेश्वरच्या मतदारांचा पूर्ण विश्वास, सर्व २१ जागांवर दणदणीत विजय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बंडखोर पुरुषोत्तम जगताप व शरद पवार गटाचा पराभव

पुणे । शुगरटुडे वृत्त
बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती आला असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व २१ पैकी २१ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत विद्यमान चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचा दारुण पराभव झाला असून, शरदचंद्र पवार प्रणीत युगेंद्र पवार यांच्या पॅनललाही पराभवाचा धक्का बसला आहे.

अजितदादांना विजय समर्पित; पार्थ पवारांना पेढा भरवून जल्लोष

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. या दणदणीत यशानंतर आमदार विक्रम काकडे यांनी खासदार पार्थ पवार यांना पेढा भरवून विजयाचा आनंद साजरा केला.

या विजयाबद्दल बोलताना प्रतिनिधींनी सांगितले की, “हा विजय आम्ही स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना समर्पित करतो. आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी , तसेच पार्थ दादा आणि जय दादा यांनी जी रणनीती आखली होती, त्याचाच हा मोठा विजय आहे”.

Someshwar Sugar Parth Pawar-Vikram Kakade
“लक्ष्मी दर्शन आणि पैशांचा मोठा वापर झाला” – पराभूत गटाचा आरोप

दुसरीकडे, पराभव स्वीकारताना विरोधी गटाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “आम्ही जनमताचा निश्चितपणे आदर करतो, परंतु यामध्ये विरोधकांचे कोणतेही कर्तृत्व आहे असे आम्ही मानत नाही. निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला गेला आणि त्यामुळेच शेवटच्या क्षणी हे सगळे चित्र बदलले, अन्यथा सभासद आमच्याच पाठीशी होते,” असा दावा पराभूत गटाकडून करण्यात आला.

या निकालाने बारामतीतील राजकीय गेम पूर्णपणे पलटला असून शरद पवारांच्या पॅनलला मोठा धक्का बसला आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाने बारामतीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गेम पालटवला आहे. केवळ पुरुषोत्तम जगतापच नाही तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पॅनललाही सुनेत्रा पवार यांनी जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकल्या आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून बारामतीवर आपलंच निर्विवाद वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. संग्राम सोरटे, प्रमोद काकडे. अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे हे चार उमेदवार दुपारीच निवडून आले होते. त्यामुळे 21 पैकी थेट 4 जागांवर विजय मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार जल्लोष सुरू केला. संध्याकाळी निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 21 जागांवर निर्विवाद विजय मिळवला.

विजयाचे श्रेय तिघाांना 

या विजयानंतर अभिजीत काकडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी अभिजीत काकडे यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर सडकून टीका केली. तसेच विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना दिले आहे.

कार्यकर्त्यांचा जल्लोष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी बारामती तालुक्यातील सर्व मतदारांनी अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सुनेत्रा पवार यांनी इलेक्शनमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यामुळे आम्हाला विजय मिळाला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »