ऊसदरात मागे राहणार नाही; विवेक कोल्हेंची ग्वाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोपरगाव : प्रतिकूल परिस्थितीतही इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना ऊसदरात मागे राहणार नाही, अशी ग्वाही आमदार विवेक कोल्हे यांनी दिली. शेतकरी आणि साखर उद्योगासमोरील अडचणींवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या ६४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, आमदार विवेक कोल्हे, संचालक बाळासाहेब वाकते, सरला वाकते यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते.

दुष्काळाच्या संकटावर सामूहिक प्रयत्नांची गरज

माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीमुळे कारखान्याने गेल्या ६४ वर्षांत अनेक संकटांना सामोरे जात शेतकरी आणि पशुधनाला आधार दिला, असे विवेक कोल्हे यांनी नमूद केले. तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.

यंदा दुष्काळाचे मोठे आव्हान असून, शेती आणि त्यावर अवलंबून असलेला साखर उद्योग टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडींचाही उद्योगावर परिणाम होत असल्याने परिस्थितीचा विचार करून नियोजन करावे लागणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

कमी क्षेत्रात अधिक ऊस उत्पादन घ्या

दहा गुंठ्यांत २५ ते ३० टन ऊस उत्पादन कसे घेता येईल, यासाठी सभासद शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोल्हे यांनी केले. उत्पादनवाढीसाठी थेट शेताच्या बांधावर जाऊन आवश्यक उपाययोजना करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणी उपलब्धतेसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख

तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दिवंगत शंकरराव कोल्हे यांनी विविध धरणांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मदत झाली आणि शेतीवरील संकट कमी होण्यास हातभार लागला, असे बिपिन कोल्हे यांनी सांगितले.

विवेक कोल्हे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. साखर आणि इतर कच्च्या मालाच्या वाढत्या दरांकडे त्यांनी लक्ष वेधले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »