कर्नाटकात ४४ नव्या साखर कारखान्यांसाठी अर्ज

बेळगाव : इथेनॉलची वाढती मागणी आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमामुळे कर्नाटकात नवीन साखर कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजकांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षी नव्या कारखान्यांसाठी ३४ अर्ज दाखल झाले होते. त्यात आणखी १० अर्जांची भर पडल्याने एकूण अर्जांची संख्या ४४ झाली आहे. मात्र, या कारखान्यांना पुरेसा ऊस आणि पाणी उपलब्ध होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवीन साखर कारखान्यांमुळे राज्याची गाळप क्षमता वाढण्याबरोबरच रोजगारनिर्मिती आणि इथेनॉल उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, आवश्यक कच्चा माल आणि पाण्याची उपलब्धता नसल्यास कारखान्यांच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात.
राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. तरीही सध्या कार्यरत कारखान्यांची गाळप क्षमता, त्यांची उसाची गरज आणि प्रस्तावित कारखान्यांसाठी लागणारा अतिरिक्त ऊस यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे इथेनॉलची मागणी वाढली आहे. त्यामुळे साखर उत्पादनासोबत इथेनॉल निर्मितीतून उत्पन्न मिळवण्याची संधी कारखान्यांना उपलब्ध झाली असून, या उद्योगात गुंतवणुकीसाठी उद्योजक पुढे येत आहेत.
परवानगीपूर्वी सविस्तर आढावा हवा
ऊस उत्पादन हे पावसाचे प्रमाण, सिंचन सुविधा, जमिनीची सुपीकता आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. त्यामुळे नवीन कारखान्यांना परवानगी देण्यापूर्वी संबंधित भागातील ऊस उत्पादन, विद्यमान कारखान्यांची गाळप क्षमता आणि उपलब्ध जलस्रोत यांचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ इथेनॉलची वाढती मागणी लक्षात न घेता, ऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारे निर्णय घेण्याची गरज आहे.






