उसाला भीषण आग; ६० ते ७० एकरांवरील पीक जळाले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : वाकडी (ता. लातूर) येथील शिवारात उसाच्या शेताला अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे ६० ते ७० एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विकास सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन पथक आणि ग्रामस्थांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली.

आगीची माहिती मिळताच कारखान्याचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. चालक शौकत अली नईकवाडी आणि त्यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग परिसरातील इतर शेतांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

वाऱ्यामुळे आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे मोठ्या क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ऊस हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असल्याने या नुकसानीचा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

प्रशासनाने जळालेल्या उसाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »