नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी
नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४ उमेदवार विजय झाले.
काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध तर एक विजयी झाले होते.
निकाल जाहीर होताच माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक झाली. यापूर्वी पाच वेळा बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. यावेळी १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत झाली.
आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये १४ उमेदवार असे दोन्ही गटातील एकूण २९ उमेदवार निवडणुकीचा रिंगणात उभे होते.
पहिल्या फेरीमध्ये शेतकरी विकास पॅनलला परिवर्तन पॅनलने धक्का दिला. तब्बल ११ उमेदवार आघाडीवर होते. तर शेतकरी विकास पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर होते. कारखान्याच्या संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे आरिफ बलेसरिया, अजित नाईक हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते.
कारखाना स्थापनेपासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. या पंचवीस वर्षात पाच वेळा बिनविरोध निवडणूक झाली. यावेळी सहावी पंचवार्षिक निवडणूक लागली. यात काँग्रेस पक्षाचे शेतकरी विकास पॅनल व भाजपचे परिवर्तन विकास पॅनल यात सरळ लढत झाली.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार
नवागाव गटातून हरिदास गावित (२५९६), नवापूर गटातून आलु गावित (२४७१), देवराम गावित (२४२२), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित (२४०९), विसरवाडी गटातून बकाराम गावित ( २५६८), रमेश गावित (२४९१), खांडबारा गटातून लक्ष्मण कोकणी (२५०१), रावजी वळवी (२४४१), नंदुरबार गटातून जगन कोकणी (२५६१), रुद्राबाई वसावे (२४७३), महिला गटातून मीराबाई गावित (२५०२), संगीता गावित ( २४९०), अनुसूचित जाती जमाती गटातून सीताराम ठाकरे (२६०२), भटक्या विमुक्त जाती रमेशचंद्र राणा (२६४४).
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार ..
नवागाव गटातून विनोद नाईक यांना (२३४४), संस्था या गटातून अजित नाईक तर इतर मागास वर्गातून आरिफ बलेसरिया यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीत आमदार शिरीषकुमार नाईक यांचाही पराभव झाला. तो काँग्रेसप्रणीत पॅनेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आदिवासी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद मतदारांनी कारखाना सुरळीत चालविण्यासाठी विश्वास टाकला आहे. आमच्या परिवर्तन पॅनलला विजयी करून एकहाती सत्ता दिली. मतदारांचा विश्वास सार्थ करू, हा विजय म्हणजे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांना एकप्रकारे श्रद्धांजली आहे.
-भरत गावित, भाजप तालुकाध्यक्ष
मतदारांनी दिलेला कौ मान्य आहे. कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद मतदारांच्या मताचा आदर कायम ठेवू. कारखाना सुरळीत चालावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. म्हणून आजवर कारखाना सुरु आहे, यापुढेही शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत.
- शिरीषकुमार नाईक, आमदार
