सोमेश्वर कारखान्याचा ऊसदरात नवा विक्रम!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत माहिती दिली.

यापूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ३,६०० रुपये, फेब्रुवारीतील उसासाठी ३,९०० रुपये, तर मार्चमधील उसासाठी ४ हजार रुपये दर जाहीर करण्यात आला होता. आता अंतिम दरात अनुदानाचा समावेश करून प्रतिटन ४ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

मागील गाळप हंगामात कारखान्याने सुमारे १२ लाख १८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यंदाच्या २०२६-२७ गाळप हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे ३१ हजार एकर उसाची नोंद झाली असून, आगामी हंगामात अंदाजे १२ ते १२.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत आगामी हंगामातही सर्वाधिक ऊसदर देण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. यावेळी सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखत सुमारे १५ लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तसेच को-जनरेशन प्रकल्पातून वीज निर्मिती व विक्री, तसेच डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल आणि इथेनॉल उत्पादन घेण्यात आले आहे.

सभासदांच्या खात्यावर अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याचा ऊसदर आणि शेतकऱ्यांना मिळणारा अंतिम मोबदला याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »