प्रत्येकाची काळजी वाहणारे नितीनजी…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी लिहिलेला हा विशेष लेख
दि. २७ मे २०२६

११ एप्रिल २०२६ ची संध्याकाळ होती ती. त्या दिवशी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स विदर्भ चे एक शिष्ट मंडळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी भेटायला पोहोचले होते. संघटनेचा विदर्भ प्रांत अध्यक्ष असल्यामुळे सहाजिकच शिष्टमंडळाचे नेतृत्व माझ्याकडे होते.

आम्ही अतिथी कक्षात वाट बघत बसलो होतो. थोड्याच वेळात नितीनजी गडकरी येऊन पोहोचले. आल्यावर पहिले त्यांनी आमच्याच शिष्टमंडळाला बोलावले. आमच्यासोबतचे नितीन कुलकर्णी यांनी त्यांना विषय समजावून सांगितला आणि या नव्या संघटनेचे अध्यक्ष अविनाशजी पाठक झाले आहेत असे सांगितले.

हे ऐकताच माझ्याकडे बघत नितीनजी उद्गारले “आता म्हातारपणी कसल्या नसत्या उचापती करत बाहेर फिरतोस? घरात चुपचाप बस ना! त्यावर मी लगेच उत्तरलो “मी म्हातारा झालो आहे का? नितीनजी लगेच म्हणाले “म्हातारा नाहीस तर काय तू आता पंचवीशीतला जवान राहिला आहेस का?” मी लगेचच उत्तर दिले “तुम्ही आणि मी समवयस्क तर आहोत. तुम्ही ६९चे होणार आणि मी ७१ चा. म्हणजे बरोबरीचेच ना! त्यावर नितीनजी लगेच उत्तरले, “अरे हो, पण जरा तुझी तब्येतही सांभाळ, गेल्यावर्षी तू किंग्सवे हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस राहून आलायस आणि नंतरही चार महिने घरात आडवाच होतास. मला कल्पना आहे सगळी. त्यावर मी लगेच त्यांना सांगितले की आता माझी तब्येत चांगली सुधारली आहे. आता माझी काम सुरू झाली आहेत, आणि मी आता एकट्याने काम करत नाही. ही मंडळी माझ्यासोबत असतातच. असे म्हणताच नितीनजी लगेच म्हणाले “बरं बरं आता काय काम आहे तुमच्या संघटनेचे सांगा.”

मग आम्ही विषय बोलायला सुरुवात केली. त्यांनी आमचे मुद्दे ऐकून घेतले आवश्यक त्या सूचना स्वीयसहाय्यकांना दिल्या. निघताना सर्वांनी चहा घेतला का याची चौकशी केली, आणि मग सोबतच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना म्हणाले “आता या अविनाशला एकट्याने फिरू देत जाऊ नका, त्याला घरी बसून काम करू द्या आणि त्याचं मार्गदर्शन घ्या. बाकी काम तुम्ही करा.” आपल्या जवळच्या मित्राचा काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव यातून स्पष्ट होत होता.

आपले नातेवाईक, मित्रमंडळी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या व्यक्तिगत सुखदुःखांची काळजी करणे आणि त्यांना सांभाळून घेणे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वभावातले एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गतवर्षी मी अचानक आजारी पडलो. मला तातडीने किंग्सवे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. नितीनजींच्या हे कानावर जाताच त्यांनी काही सहकारी पत्रकारांना सांगून माझ्या मुलीला त्यांच्या घरी बोलावून घेतले आणि माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी लगेच किंग्सवे हॉस्पिटलमध्ये संबंधितांना फोनही केले आणि कोणतीही मदत लागली तर मला लगेच कळवा असे आश्वस्त देखील केले. सोबत हॉस्पिटलचा खर्च बराच मोठा आहे, त्यामुळे हे तुझ्या सोबत असू दे असे म्हणत माझ्या मुलीच्या हातात त्यांनी आर्थिक मदतीचे पाकीटही दिले. नंतरही ते सतत फोन करून माझ्या प्रकृतीची माहिती घेत होते.

सुमारे वर्षभराने म्हणजेच आता दिवाळी २०२५ मध्ये त्यांनी पत्रकारांच्या स्नेहभोजनाला मला निमंत्रित केले होते. त्या दिवशी मी त्यांच्याकडे पोहोचलो तेव्हा स्वागताला तेच उभे होते. त्यांनी लगेचच सर्वप्रथम “आता तुझी तब्येत कशी आहे?” याची चौकशी केली. मग सर्व माहिती घेऊन “नीट काळजी घे, काही अडचण लागली तर सांग,” असेही ठणकावले. यावेळी नुकताच माझ्या शह-काटशह या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला होता. त्या पुस्तकाची प्रत मी त्यांना दिली. हे पुस्तक प्रकाशित झाल्याचे मी वृत्तपत्रात वाचले असे सांगत त्यांनी पुस्तक चाळले देखील. त्यातील एक दोन राजकीय कथा चाळत या कोणावर लिहिल्यास असा प्रश्नही त्यांनी केला.

नितीनजींचा माझा परिचय जवळजवळ ५२-५३ वर्ष जुना आहे. त्यावेळी विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मी आणि नितीनजी एकदमच सक्रिय होतो. सुरुवातीच्या काळात ही दूरदर्शनचा न्यूज कॅमेरामन म्हणून काम करत असे. नंतर मी मुद्रित माध्यमातील पत्रकार म्हणून सक्रिय झालो. त्याच काळात नितीनजी आमदार झाले होते. मग आमच्या नियमित भेटी होऊ लागल्या होत्या.

त्या काळात समवयस्क असल्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांशी एकेरीतच बोलायचो. हा सिलसिला नितीनजी मंत्री झाल्यावरही सुरू राहिला. मात्र ज्यावेळी नितीनजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांचे नाव आता पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणूनही घेतले जाऊ लागले. ती चर्चा सुरू झाल्यावर मी मनाशी ठरवले की आता नितीनचा उल्लेख एकेरीत करायचा नाही. त्याला नितीनजी म्हणूनच हाक मारायचे. त्यावर्षी एका दैनिकाने मला नितीन च्या वाढदिवसाला लेख मागितला होता. त्या लेखाचे शीर्षकच मी “नितीनजी बनण्यापूर्वीचा नितीन” असे दिले होते आणि त्यात सर्व जुने वर्णनही केले होते.

कोणालाही मदत करायची आणि काळजी घ्यायची हा त्यांचा स्वभाव सर्वांसाठी सारखाच होता. काही वर्षांपूर्वी आमचा सहकारी पत्रकार मित्र श्याम जहागीरदार बराच आजारी झाला होता. त्यातून बरा होऊन तो कामाला लागल्यावर एकदा पत्र परीषदेत त्याची नितीनजींची भेट झाली. यांनी लगेचच त्याची चौकशी केली आणि तब्येतीची काळजी घे, काही अडचण लागली तर सांग असे म्हणून त्याला धीर दिला होता.

२०२० मध्ये कोरोनामुळे देशात लॉक डाऊन लागला. एकमेकांच्या भेटी बंदच झाल्या होत्या. राजकीय नेत्यांच्या पत्रपरिषदा आणि कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भेटी या देखील थांबल्या होत्या. पुढल्या पंधरा-वीस दिवसातच नितीनजींनी नागपूरातील सर्व पत्रकारांची एक झूम मीटिंग घेतली आणि त्यात सर्वांची त्यांनी चौकशी केली. त्या काळात बऱ्याच पत्रकारांच्या नोकऱ्या जायचीही सुरुवात झाली होती. अशा ज्यांच्या ज्यांच्या नोकऱ्या जातील त्यांनी माझ्याशी संपर्क करा मी काय मदत करता येईल ते बघेल, असेही त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केले. सर्व पत्रकारांना कोणतीही अडचण आली तर माझ्या पी आर ओ ला लगेच तुम्ही कळवा, तुम्हाला योग्य ते मदतनी करीन असे त्यांनी सांगितले. ते फक्त सांगून थांबले नव्हते तर त्यांनी सर्वांना वेळोवेळी मदतही केली होती.

२००८ मध्ये माझे पहिले पुस्तक दाहक वास्तव याचा प्रकाशन समारंभ ठरला होता. प्रकाशन समारंभाला आधी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथजी मुंडे, प्राचार्य राम शेवाळकर, साहित्यिक गिरिजा कीर, पत्रकार सुधीर पाठक असे सर्व मान्यवर निमंत्रित केले होते. मात्र कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी गोपीनाथजींना अचानक राजस्थान मध्ये जावे लागले. तिथे विधानसभेच्या निवडणुका लागणार होत्या आणि गोपीनाथजी तिथले प्रभारी होते. त्यामुळे त्यांचा मुक्काम तिकडेच राहणार होता. ते येऊ शकणार नाहीत असा त्यांच्या कार्यालयाकडून निरोप आला. वेळेवर कोणाला बोलवायचे यासाठी माझी धावपळ सुरू झाली.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी माझे मित्र आणि भाजपाचे तत्कालीन प्रवक्ते माधव भंडारी यांचा फोन आला. “अविनाश उद्या नितीनजी नागपुरात आहेत, तू त्यांना बोल, ते कार्यक्रमाला येऊ शकतात” त्यावेळी नितीनजी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. मी लगेचच नितीनजींना फोन लावला. त्यावेळी ते मुंबईत होते. मी त्यांना अडचण सांगितली. त्यांनी लगेचच कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला.” तू नागपूरला माझ्या ऑफिसमध्ये सुधीर देऊळगावकरला फोन करून कार्यक्रम नोंदवून घ्यायला सांग, मी नक्की येतो” असा शब्द त्यांनी दिला.

त्या वेळेपर्यंत कार्यक्रमाचे स्टेजवरील बॅक ड्रॉप तयार झाले होते. त्यावर गोपीनाथजींचे नाव होते. वेळेवर ते बदलणेही शक्य झाले नाही. त्यामुळे ते तसेच लावले. ठरल्याप्रमाणे नितीनजी कार्यक्रमाला आले आणि त्यांनी कार्यक्रम साजरा करून दिला. आपल्याला ऐनवेळी बोलावले, गोपीनाथजींच्या जागी आपल्याला बसवले याबाबत त्यांच्या मनात कोणताही राग नव्हता. तुझी वेळ निभावली जाणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते हेच त्यांनी त्यावेळी मला सांगितले.

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला नितीनजी होते, तसेच अकराव्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले. ही घटना ऑगस्ट २०२० ची, त्यावेळी कोरोनाचा जोर होता. त्यांना फोन करून आपण ऑनलाइन कार्यक्रम घेऊया अशी विनंती केली. तेव्हा त्यांचे खाजगी सचिव कौस्तुभ फलटणकरचा फोन आला की नितीनजी म्हणतात “तुम्ही दोघेजण इथेच या, आपण घरीच प्रकाशन करू.” मग मी, माझी पत्नी अनुरूपा, माझे एक मित्र डॉ. उदय बोधनकर आणि माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती असे चौघेही जण ठरल्यावेळी त्यांच्या घरी पोहोचलो‌. त्यांनी पुस्तकाचे विधीवत प्रकाशन केले आणि फोटोही काढून घेतले. “तुझ्या पुस्तकाचे प्रकाशन झालं हा मला आनंद आहे, बाकी ऑनलाईन कार्यक्रमात तरी काय होणार? त्यापेक्षा आपण घरीच उरकू या,” असे त्यावेळी नितीशजी म्हणाले होते.

नितीनजींचे एक विशेष कार्य अधिकारी अतुल मंडलेकर यांची काही वर्षांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना तामिळनाडूमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तातडीने ऑपरेशन साठी नेणे गरजेचे होते. त्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलने काही लाख रुपये ताबडतोब भरायला सांगितले होते. नितीनजींनी रातोरात व्यवस्था केली आणि मंडलेकरांना अक्षरशः विशेष विमानाने चेन्नईला पाठवले. त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि ते पुन्हा कामावर रुजू देखील झाले.

नितीनजी आज देशातील पहिल्या पाच प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. मात्र त्यांनी माझ्यासारख्या अनेकांशी मैत्र जपले आहे. या आपल्या स्नेहीजनांना ते कायम मदत करायला तयार असतात, आणि सर्वांची काळजी करत असतात. विशेष म्हणजे मदत करून ते मोकळे होतात. त्याचा गाजावाजा ते कधीही करत नाहीत.

असे नितीनजी गडकरी, आज एक मोठे नेते असूनही सर्वांची कायम काळजी वाहत असतात हेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आज आज २७ मे २०२६, आज नितीनजी वयाची ६९ वर्ष पूर्ण करून ७० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे हीच प्रभू चरणी प्रार्थना.

अविनाश पाठक…

*अविनाश पाठक यांनी लिहिलेले इतर सर्व लेख वाचण्यासाठी Litteratuer Avinash Pathak या त्यांच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….
https://www.facebook.com/share/1AvXwZmQQT/

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »