पंजाबमध्ये साखर कारखाने उभारण्याचा अनुभव अविस्मरणीय

एस. बी. भड (चेअरमन, एस एस इंजिनिअर्स) यांची विशेष मुलाखत
प्रसिद्ध उद्योजक श्री. शहाजीराव भड (एस. बी. भड) हे भारताच्या साखर उद्योग क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते साखर उद्योग क्षेत्रात १९७२ पासून कार्यरत आहेत, तब्बल ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ते डिझाईन इंजिनिअर आहेत. सुमारे साडेचार दशकांपूर्वी त्यांनी ‘एस. एस. इंजिनिअर्स’ ही कंपनी दहा वर्षे सर्व्हिस केल्यानंतर स्थापन केली आणि मोठ्या कष्टाने ती नावारूपास आणली.
साखर उद्योगातील लोकांचा विश्वास कमावला. त्यांनी नुकतेच पंजाबमध्ये दोन महत्त्वाचे साखर कारखाने (संपूर्ण प्रकल्प) पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नंदकुमार सुतार यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी श्री. भड यांनी अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

एस एस इंजिनिअर्स (S S Engineers) ही कंपनी १९८० पासून म्हणजेच ४५ वर्षांपासून कार्यरत आहे. श्री. भड यांनी १९७२ मध्ये सीओईपी (COEP) पुणे येथून बी. ई. मेकॅनिकल पूर्ण केल्यानंतर वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये पाच वर्षे डिझाईन इंजिनिअर म्हणून आणि त्यानंतर पाच वर्षे साखर उद्योगात सल्लागार म्हणून काम केले. पुढे म्हणजेच १९८७ मध्ये त्यांनी छोटा वर्कशॉप सुरू करून २००१ सालापासून संपूर्ण शुगर प्लॅन्ट्स (Complete Sugar Plants) बनवायला सुरुवात केली.

एस. बी. भड
प्रश्न: पंजाबमधील दोन मोठे संपूर्ण प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन! मराठी माणसाने एवढ्या दूरच्या राज्यात जाऊन, तिथे साखर कारखाने उभे करून देणे, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. पंजाबमध्ये जाऊन इतके मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान आपण कसे स्वीकारले?
उत्तर: धन्यवाद. सुरुवातीला त्या दोन प्रकल्पांसाठी टेंडर निघाले होते आणि आम्ही ते भरले. पंजाब सरकारने आमचे आजवरचे काम पाहून, आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमचे टेंडर स्पर्धात्मक प्रक्रियेतून मंजूर झाले. ही गोष्ट साधारण अडीच ते तीन वर्षांपूर्वीची आहे.
प्रश्न: महाराष्ट्रातून पंजाबमध्ये जाऊन काम करताना कोणती मोठी आव्हाने होती आणि त्यावर कशी मात केली?
उत्तर: सर्वात मोठे आव्हान म्हणजे भौगोलिक अंतर. पुणे आणि पंजाबमध्ये खूप अंतर आहे. इथून माणसे ट्रेनने पाठवायची म्हटल्यास दोन दिवस लागतात, तर विमानाने पाठवल्यास तिकीट खूप जास्त असते, ज्यामुळे खर्चात मोठी वाढ होते. शिवाय आपल्याकडील चांगले तंत्रज्ञ आणि कामगार तिकडे जाण्यास पगार खूप मागतात.
दुसरे आव्हान म्हणजे भाषेची समस्या! इथून गेलेल्या मराठी लोकांची हिंदी, पंजाबच्या लोकांची पंजाबी आणि उत्तर प्रदेश-बिहारमधून आलेल्या लोकांची हिंदी यामुळे स्किल्ड मॅनपॉवर स्तरावर भाषेचा समन्वय साधताना अडचणी येतात. परंतु, मी स्वतः वारंवार तिथे भेट दिल्यामुळे या सगळ्या समस्यांवर मात करत, सगळ्यांशी समन्वय साधून काम मार्गी लावले.
पंजाबमधील हवामानही विषम आहे. हिवाळ्यात अतिथंडी म्हणजे चक्क ० ते २ अंश से. पर्यंत तापमान घसरते, तर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस इतकी अतिउष्णता असते. त्यामुळे कामाचे तास वेगवेगळ्या वेळी ठरवावे लागतात . तसेच, आम्ही कमी किमतीची निविदा भरली होती आणि त्यात पेमेंटला विलंब व्हायचा; त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

प्रश्न: पंजाबमधील हे दोन्ही साखर कारखाने नेमके कुठे आहेत आणि तिथल्या उसाच्या पिकाची स्थिती कशी आहे?
उत्तर: हे दोन्ही साखर कारखाने अमृतसर ते पठाणकोट या एकाच मार्गावर आहेत. एक अमृतसरपासून सुमारे ४० किलोमीटरवर बटाला येथे आहे आणि दुसरा बटालापासून पुढे ४० किलोमीटरवर गुरदासपूर येथे आहे. या फॅक्टरीज पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहेत. गुरदासपूरपासून पाकिस्तानची सीमा फक्त ११ किलोमीटरवर, तर बटालापासून २२ किलोमीटरवर आहे.
तिथे ऊस पिकवला जातो, परंतु महाराष्ट्राच्या तुलनेत सरासरी उत्पादन (average production) खूप कमी आहे आणि साखर उतारा देखील खूप कमी आहे. तसेच उसाबरोबर माती, मुळे, वाढे व पालापाचोळ्याचा फार येतो. तिथे स्थानिक वाण वापरले जाते. महाराष्ट्राचे आकडे ऐकल्यास त्यांना आश्चर्य वाटते.
प्रश्न: पंजाबमधील सहकारी साखर कारखान्यांचे मॉडेल महाराष्ट्रापेक्षा वेगळे आहे का?
उत्तर: पंजाबमधील सहकारी साखर कारखाना उभारण्याचे मॉडेल आपल्या महाराष्ट्रापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तिथे सहकारी साखर कारखान्यांमध्ये सरकारचे भागभांडवल म्हणजे शेअर्स ९९ टक्क्यांच्या वर आहेत आणि शेतकऱ्यांचे शेअर्स एक टक्क्यापेक्षा कमी आहेत.
त्यामुळे संपूर्ण नियंत्रण सरकारकडे असते. वरिष्ठ अधिकारी हे आयएएस अधिकारी असतात जे फॅक्टरीचे कामकाज नियंत्रित करतात. विशेष म्हणजे, सर्व कामगारसुद्धा सरकारी नोकर असतात. या कारखान्यांवर पूर्ण सरकारी नियंत्रण असले तरी शेतकऱ्यांचे संचालक मंडळ असते आणि ते निर्णय घेतात. कारखान्याच्या कामकाजाबाबत व अन्य बाबींविषयी सरकारला शिफारशी करण्याचे संचालक मंडळास पूर्ण अधिकार असतात .
प्रश्न: या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना उसाचा भाव कसा मिळतो?
उत्तर: पंजाबमध्ये रिकव्हरी सर्वात कमी आहे, परंतु ऊस दर जगात सर्वात जास्त आहे. हे शक्य होते कारण सरकार कारखान्यांना ऊस बिलांसाठी सबसिडी देते.
प्रश्न: एस एस इंजिनिअर्सने आतापर्यंत किती संपूर्ण प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत? महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर त्याचे प्रमाण किती आहे?
उत्तर: पंजाबचे हे दोन प्रकल्प ४१ वे आणि ४२ वे संपूर्ण प्रोजेक्ट आहेत. यापूर्वी, म्हणजेच २००१ नंतर आम्ही राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात एकूण ४० संपूर्ण प्रकल्प उभे केले आहेत. एकूण प्रकल्पांपैकी ७५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत, तर २५ टक्के महाराष्ट्राबाहेर आहेत. आमचे दोन कारखाने सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत, ते ४३ आणि ४४ क्रमांकांचे संपूर्ण प्रकल्प आहेत.
प्रश्न: संपूर्ण प्रकल्प (म्हणजे शून्यापासून साखर उत्पादनापर्यंत असा संपूर्ण प्रकल्प एका हाती उभा करणे) व्यतिरिक्त साखर उद्योग क्षेत्रात आपण भरीव काम करत आहात, त्याबाबतही वाचकांना ऐकायला आवडेल.
उत्तर: संपूर्ण प्रकल्प (४४) व्यतिरिक्त, आम्ही १२० बॉयलर आणि ३०० मिल (Mill) बसवले आहेत. तसेच, १०० हून अधिक बॉयलिंग हाऊस (Process Equipment) विविध साखर कारखान्यांमध्ये स्थापित केले आहेत. आठ डिफ्युजर्स, पाच डिस्टिलरीज उभारण्यासह व इतर अनेक विस्तार प्रकल्पदेखील पूर्ण केले आहेत.
साखर कारखान्यात मिलिंग सेक्शन, बॉयलर (स्टीमसाठी), टर्बाइन (वीज निर्मितीसाठी) आणि बॉयलिंग हाऊस असे चार मुख्य विभाग असतात. त्यातील टर्बाइन वगळता बाकी सगळे आम्ही स्वतः ‘एस. एस. इंजिनिअर्स’ येथे पूर्णपणे तयार करतो. अनेक कारखाने क्षमता वाढवण्यासाठी केवळ बॉयलर, मिल्स किंवा केवळ प्रोसेस इक्विपमेंट घेतात. ते सर्व आमच्याकडे तयार होतात. अर्थात मोटर्स, गिअर बॉक्सेस, पाईप, व्हॉल्व्हस् असे सुटे भाग (Standard Parts) विकत घेतले जातात.
प्रश्न: आपणास साखर उद्योग क्षेत्राचा तब्बल ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे, या कालावधीत साखर उद्योगाच्या तंत्रज्ञानात कोणते मोठे बदल झालेले आपण पाहिले आहेत?
उत्तर: तंत्रज्ञानात खूप बदल झाले आहेत. पूर्वीचे काम पूर्णपणे मॅन्युअल (Manual) होते, आता पूर्णपणे ऑटोमॅटिक (Automatic) झाले आहे. मॅन पॉवर कमी झाली आहे, परंतु परफॉर्मन्स अर्थात कार्यक्षमता खूप वाढली आहे.
जुन्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत, आता किमान दुप्पट कार्यक्षमता झाली आहे. उदाहरणार्थ, पूर्वीची ३० इंच मिल प्रति दिन २००० टन ऊस गाळप करायची, ती आता सहज उत्तम कार्यक्षमतेसह, प्रति दिन ४००० टनांहून अधिक गाळप करत आहे. मिल्स, बॉयलर आणि बॉयलिंग हाऊसमध्येही कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्ण डिझाईन्समध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे साखर उतारा वाढीबरोबरच, बगॅस व स्टीम बचत, पॉवर बचत हे उत्तमपणे साध्य होत चालले आहे, तसेच पूर्ण ऑटोमेशन झाले आहे .
प्रश्न: साखर उद्योगाच्या भविष्याबद्दल आपले मत काय आहे? काय आव्हाने असतील?
उत्तर: भारतामध्ये ज्या ठिकाणी ऊस आहे, तिथे नवीन शुगर फॅक्टरी टाकण्यासाठी ऊस क्षेत्रात जागा राहिलेली नाही. म्हणजे वाढीवर मर्यादा आल्या आहेत. त्यात आता काही कारखाने आपली गाळप क्षमता वाढवत आहेत. यामुळे गाळपाचे दिवस (Season Days) कमी होत चालले आहेत.
उसाचे क्षेत्र तेवढेच आहे, परंतु जास्त गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस गाळप हंगाम लवकर संपतो. माझ्या मतानुसार, भविष्यात साखर उद्योग वाढीसाठी भारताबाहेर, विशेषतः आफ्रिकेत अधिक वाव आहे, कारण तिथे अजून सुरुवात होत आहे. त्यामुळे तिकडे मुबलक संधी आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे उत्पादन आणि खप (Production and Consumption) यांचा हिशोब (बॅलन्स) राखला पाहिजे. उत्पादन कमी किंवा जास्त होता कामा नये. समतोल बिघडल्यास अडचणी सुरू होतात.

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे हस्ते सन्मान.

करताना एस. बी. भड.

याची माहिती देण्यासाठी त्यांनी पंजाबी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील ऊस शेतीचा अभ्यास दौराही घडवून आणला.

उल्लेखनीय योगदानासाठी ‘स्टार परफॉर्मर अॅवार्ड’ देऊन एस. बी. भड यांचा गौरव करण्यात आला. (सन २००९)
प्रश्न: साखर कारखाना फक्त ३-४ महिने चालतो, तर वर्षभर चालवण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात?
उत्तर: खरं तर शेकडो कोटींची गुंतवणूक करून, साखर कारखाने केवळ तीन-चार महिने चालवणे व्यवसाय नियमांमध्येच बसत नाही. म्हणून मला वाटते की, कारखाने जास्त दिवस चालवण्यासाठी बीट (Beet) एक चांगला पर्याय आहे. बीट हे चार महिन्यांचे पीक असून त्यात १७-१८% साखर असते, तर ऊस १२ महिन्यांचे पीक असून त्यात १५-१६% साखर असते. बीटला थंडी लागते. ज्या काळात उसाचा हंगाम असतो (हिवाळ्यामध्ये), त्या काळात जर बीट उत्पादन केले, तर उसाच्या हंगामानंतर बरेच दिवस कारखाने बीटवर चालू शकतात. नंतर डिस्टिलरीज पण कमीत कमी तीनशे दिवस चालतील, असे नियोजन करावे लागेल.
प्रश्न: सध्याच्या साखर कारखान्यांची रचना बीट गाळपासाठी योग्य आहे का?
उत्तर: नाही, बीटवर प्रक्रिया करण्यासाठी सध्याच्या सेटअपमध्ये थोडा बदल करावा लागतो, म्हणजे डिफ्युजर प्लांट (Diffuser Plant) हवा असतो. ज्या फॅक्टरीमध्ये आधीपासून डिफ्युजर असेल, तिथे कमी खर्चात हे शक्य आहे.
प्रश्न: साखरेचे उत्पादन जास्त झाल्यास बाजार व्यवस्थापन कसे करता येईल?
उत्तर: साखरेचे उत्पादन जास्त झाल्यास, निर्यात (Export) हाच सर्वात चांगला उपाय ठरतो. आफ्रिकेत साखर ७२ ते ८० रुपये किलो आहे, तर आपल्याकडे अर्धी किंमत आहे. किंवा अल्कोहोलसारखे इतर प्रॉडक्ट्स तयार करून निर्यात करता येतील किंवा देशांतर्गत इंधनासाठी वापरता येतील.
प्रश्न: सरकारकडून शुगर इंडस्ट्रीला काय अपेक्षित आहे?
उत्तर: मुख्य म्हणजे दीर्घकालीन धोरणाची (Long Term Policy) आवश्यकता आहे. किती साखर तयार करायची, किती इथेनॉल करायचे, किती कोजन करायचे, इतर इंधने किती करायची, किती क्षेत्र ठेवायचे, किती नवीन फॅक्टरीज काढायच्या, या सगळ्याचे दीर्घकालीन नियोजन करायला हवे.
सध्या साखरेचे आणि इथेनॉलचे दर खूप कमी आहेत, त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीवर आणि मनुष्यबळावर परिणाम होत आहे. इथेनॉलबाबत सरकारने ठोस धोरण (Concrete Policy) आखण्याची गरज आहे, असे वाटते आणि यावर सरकार पातळीवर विचार होत आहे, हा चांगला संकेत आहे. यामुळे लोकांना नवीन प्रकल्प काढायचा की नाही, हे ठरवता येईल.
प्रश्न: आपणास आलेल्या पंजाबमधील अनुभवातून काय घेण्यासारखे आहे?
उत्तर: पंजाबमधील लोक खूप सरळ आहेत. तुम्ही चांगले असाल तर ते खूप चांगले सहकार्य करतात, ते अडवणूक वगैरे करत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिथे सरकारचे व लोकांचे खूप सहकार्य असते. येथील साखर संघाच्या अधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचेही सहकार्य लाभले. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला. कसलाही अडथळा आला नाही.
अविस्मरणीय आठवण
बऱ्याचदा सरकारी प्रक्रियेमध्ये फंड मिळायला वेळ लागायचा. अशा वेळी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आमच्या मदतीला येत असे. तेथील अशा सहकार्याच्या संस्कृतीमुळे एक सुखद अनुभव मिळाला.

(मुलाखती, मीडिया कवरेज, पुस्तके प्रकाशन आणि जाहिरातीसाठी शुगरटूडेशी संपर्क साधा – WhatsApp Number- 8999776721, email – sugartodayinfo@gmail.com , contact@sugartoday.in





