केंद्राच्या धोरणामुळे साखर निर्यातीवर परिणाम : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सागर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन

जालना : केंद्राच्या धोरणात सातत्य नाही, त्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लीटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे होते. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयप्रकाश दांडेगावकर, नॅचरल शुगरचे संस्थापक आणि चेअरमन बी. बी. ठोंबरे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, डॉ. निसार देशमुख, सूरज चव्हाण, बबलू चौधरी आदीची उपस्थिती होती.

विदेशामध्ये, विशेषत: शेजारच्या देशांमध्ये सध्या साखरेला चांगली मागणी आहे, दरही चांगला मिळत आहे. मात्र याचा फायदा आपल्या कारखान्यांना मिळत नाही, कारण केंद्राचे धोरण योग्य नाही, अशी टीका अजितदादा यांनी केली.

पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे उसाची लवकर येणारी वाण घ्यावीत. आडसाली ऊस केला तर आजचे ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रात हेक्टरी २५० टन उस पिकवणारे शेतकरी आहेत. त्यांना जमते मग इतर भागातील शेतकयांना का जमत नाही, असे मार्गदर्शन पवार यांनी केले.

प्रास्ताविकातून टोपे यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करताना हा प्रकल्प उस
उत्पादकाच्या तसेच कारखान्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारा आहे, असा विश्वास व्यक्त केला.
समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »