सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत चुरशीने मतदान

७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
पुणे । शुगरटुडे
‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सकाळच्या सत्रातच मतदान करून, सर्व २१ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. तर त्यांचे खासदार सुपुत्र पार्थ पवार म्हणाले, ‘साखर कारखान्याच्या सभासदांचा पाठिंबा पाहता ही निवडणूक आमच्यासाठी एकतर्फीच आहे.’
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीस दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान 68.03 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत तीन पॅनल उभे होते. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात एक पॅनेल, कारखान्याचे माजी चेअरमन पुरुषोत्तम जगतापांच्या नेतृत्वात दुसरे पॅनेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात तिसरे पॅनेल उभे आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
संचालक पदाच्या 21 जागांसाठी मतदान झाले. ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण 93 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 27,625 इतके मतदार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपच्या सहाय्याने पॅनल उभा केलेले पुरुषोत्तम जगताप निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया झाली. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील दोन तालुके आणि पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण असे कार्यक्षेत्र आहे.






