साखर आयुक्तांवरील ‘शुगरटुडे’ विशेषांकाचे प्रकाशन

पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या शुगरटुडे (SugarToday) मॅगेझीनच्या विशेष अंकाचे प्रकाशन पुण्यात नुकतेच झाले.
पुण्यातील टीपटॉप इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम इंदलकर, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, महाराष्ट्र राज्य साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरीज मॅनेजिंग डायरेक्टर्स असो.चे अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी, खजिनदार भास्कर घुले, सचिव संजीव देसाई आदींची उपस्थिती होती.
‘शुगरटुडे’च्या या विशेषांकामध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या १९८७ ते २०२३ या काळातील कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अंकामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी आदींचे लेख आहेत.
साखर आयुक्त गायकवाड येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांनी अंकाचे कौतुक केले. साखर आयुक्तांवर अशा प्रकारे अंक प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे उद्गार साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी काढले.

डी. एम. रासकर – मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
साखर आयुक्त मा. श्री. शेखरजी गायकवाड यांच्याशी ज्यांचा-ज्यांचा त्यांच्याशी संबंध आला त्यांना सुखद अनुभव आलेला असणार आहे. माणसं जोडणं हा त्यांचा छंद आहे. माणसांचा अफाट संग्रह ही त्यांची ताकद आहे. दिवसभरात विविध क्षेत्रातील अनेक माणसांना भेटणे हा त्यांचा श्वास आहे. शेखर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून प्रगतीच्या उच्चतम शिखरावर पोहोचलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व..”
(शुगरटुडे मासिकातून)

भास्कर घुले- कार्यकारी संचालक,
श्री विघ्नहर साखर कारखाना
”सहकारी साखर कारखानदारी मध्ये प्रत्येक गोष्टीची मान्यता साखर आयुक्तांकडून घ्यावी लागते आणि ही अत्यंत क्लिष्ट असणारी प्रक्रिया आहे. त्यात बराचसा वेळ वाया जातो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त कार्यालयामध्ये जेव्हापासून शेखर गायकवाड साहेब यांची साखर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली तेव्हापासून या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला सुखद धक्का बसला…..” (शुगरटुडे मासिकातून)

यशवंत कुलकर्णी-कार्यकारी संचालक,
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना
”खरं तरं ज्याच्या ठायी कार्यमग्नता, जनसेवा हेच कर्म म्हणून जगण्याची वृत्ती असते, असे दिग्गज लोककधीच सेवानिवृत्त होत नाहीत. त्यामुळे ज्या प्रमाणे गरुड पक्षी काही काळानंतर स्वतःहून स्वतःचे रूप बदलतो व गगनामध्ये अखंड भरारी घेतो, त्याप्रमाणे ‘साहेब’ देखील साखर आयुक्त या पदामधून निवृत्त होवून समाजाच्या हितासाठी, सुखासाठी उतुंग भरारी घेवून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राहतील..”
(शुगरटुडे मासिकातून)
यशस्वी आणि फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे, ऊस संजीवनीसाठी वेळापत्रक, इलेक्ट्रिक व्हेईकलच्या जमान्यात इथेनॉलला काय भवितव्य असेल असे तज्ज्ञांचे लेखही या अंकांमध्ये आहेत. नामवंत ऊस तज्ज्ञ डॉ. सुरेशराव पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, तसेच डॉ. संतोष तावरे आदींनी अंकासाठी लेखन केले आहे.
अंकासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
८९९९७७६७२१
sugartodayinfo@gmail.com