ऊस बिलासाठी स्वाभिमानींचा तिरडी मोर्चा

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
माढा : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात येणार होता. मात्र, मोर्चापूर्वीच कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा केली.
या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत येत्या २० ऑगस्टपर्यंत ऊस बिल अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तिरडी मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील यांनी केले. यावेळी विविध शेतकरी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






