डॉ. डी. वाय. दादा यांचे निधन: साखर उद्याेग क्षेत्रातही भरीव योगदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि राजकारण, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रांसह साखर उद्योग क्षेत्रातही आपला अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचे मंगळवारी दु:खद निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. असा माणूस होणे नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ आणि दादांचे साठ वर्षांपासून मित्र डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी श्रद्धांजली वाहिली.


कोल्हापूर नगरपालिकेचे नगरसेवक, सलग दोनवेळा आमदार, प. बंगाल, त्रिपुरा, बिहार राज्यांचे राज्यपाल, शिक्षणतज्ज्ञ अशी बहुपेडी ओळख असणारे डी. वाय. दादा यांची सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची माहिती बहुतेकांना आहे. मात्र त्यांचे साखर उद्योग क्षेत्रातही मोठे योगदान आहे. गगनबावड्यात त्यांनी २००३ मध्ये सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. ते त्यांचे मोठे धाडस होते. त्यांनी कारखाना उत्तमपणे चालवून दाखवला. आज त्यांचे चिरंजीव आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार वरून साडेसात हजार टन झाली आहे.

डॉ. डी. वाय. दादांच्या नावाने गगनबावडा येथेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट्‌स टेक्नॉलॉजी ही संस्था आहे.


डॉ. डी. वाय. पाटील म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील मोठा अध्याय आहे. त्यांच्या जाण्यामुळे साखर उद्योग, समाजकारण, राजकारण, शिक्षण इ. क्षेत्रांमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ‘शुगरटुडे’ परिवारांची दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक हे दादांचे ६५ वर्षांपासूनचे मित्र. दादांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, ‘असे व्यक्तिमत्त्व होणे नाही. दादांचे वडील यशवंतराव यांनी वसंतदादा पाटील यांना आपल्या शेतात लपवून ठेवले होते. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. वसंतदादा आणि त्यांचे काही साथीदारांवर ब्रिटिश सरकारने वॉरंट काढले होते. त्यामुळे वसंतदादा सहकाऱ्यांसह भूमिगत झाले. यशवंतरावांनी त्यांना मदत केली. देशासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढणाऱ्या वसंतदादांना मदत करणे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे यशवंतराव म्हणाले होते. त्यावेळी डी. वाय. दादा लहान होते.


दादांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली. त्यांची नियमितपणे दाढी करणाऱ्यास आणि सहायकास देखील त्यांनी घरे दिली. त्यांचे शेवटच्या व्यक्तीकडेही एवढे बारकाईने लक्ष होते हेच यावरून दिसून येते. दादांचा आवाका प्रचंड होता. त्यांनी उभा केलेली शिक्षण संस्था हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे, असे डॉ. मुळीक म्हणाले. त्यावेळी कोल्हापूर पालिकेत ते तरूण वयात नगरसेवक झाले आणि शेकापच्या साम्राज्यात काँग्रेसचा झेंडा रोवला. पुढे आमदार, राज्यपाल झाले; पण त्यांनी सरकारी मानधन कोणत्याही पदावर असताना घेतले नाही, अशी आठवणही डॉ. मुळीक यांनी सांगितली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »