छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शांततेत मतदान

पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी (दि. १८) सकाळपासूनच उत्साहात मतदान झाले. मतदानासाठी सभासद शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आला .
सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक रिंगणात असलेल्या जय भवानी पॅनेल आणि विरोधातील श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन केले होते. तसेच मतदारांच्या गाठी-भेटीसाठी उमेदवारांनी प्राध्यान्य दिले होते.
आयोजित प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या, त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सोमवारी, उद्या (दि. १९) सकाळीच या मतमोजणीला सुरुवात होणार असून, या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेमध्ये झाली . ‘अ’ वर्गातील ७४.२५ टक्के व ‘ब’ वर्गातील ८७.३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटी बंद झाले. सोमवारी (ता. १९) सकाळी मतमोजणी होणार आहे. २१ जागेसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ‘अ’ वर्गातील २२ हजार ७८२ मतदारांसाठी ७५ मतदान केंद्रे बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये उभारली होती.