कारे दुरावा केला दोन मनाचा

नाही मिळाली बातमी,ना हवाला|
तु कुठल्या मुलखात कधी गेला||
नाही मिळाला निरोप गमनाचा|
कारे दुरावा केला दोन मनाचा||१||
एक उसासा टाकला असेलही|
किमान आवाज दिला असेलही||
पण मला ऐकू आला नसेलही|
म्हणून तु रागावला असेलही||२||
प्रीत तुझी माझी अश्रूंनी कोरली|
याच घराशी जवळीक राहिली||
सांगायचं मनात राहून गेले|
घाईघाईने हात सोडून गेले||३||
आठवणींचा काटा टोचे मनाला |
दुःखाश्रू तयार नाही थांबायला ||
प्रेमापोटी निघे तुला शोधायला|
नाही तयार विरह भोगायला||४||
व्यथित झाले मी घायाळ हरिणी |
जाळ्यात अडकलेली मी तरूणी ||
प्रतीक्षा ही कसोटी पतिव्रतेची|
होईल भेट नल दमयंतीची||५||
इंजिनिअर कवी –वाळू रघुनाथ आहेर, नाशिक






