अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे २०२४ मध्ये २७ लाख टन साखर कोटा खुला केला होता. म्हणजेच यंदा जवळपास साडेतीन टनांनी साखर कोट्यात कपात केली आहे. देशात यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानेच केंद्र सरकारने साखर कोट्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी चर्चा घाऊक बाजारपेठेत सुरू आहे.
घाऊक बाजारात साखरेचा दर ४१२५ ते ४१५० रुपये
घाऊक बाजारात सोमवारी (दि. २८) एस ३० ग्रेड साखरेचा प्रतिक्विंटलचा दर ४१२५ ते ४१५० रुपये होता. सध्याचे साखर दर क्विंटलला २५ ते ५० रुपयांनी वाढ होऊन स्थिरावले आहेत. एप्रिलमधील साखरेच्या शिल्लक कोट्यास केंद्राने मे महिन्यात विक्रीला मुदतवाढ दिलेली नाही. मात्र, राहिलेल्या दोन दिवसांत कारखान्यांवरील साखर निविदा उंचावण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
शीतपेये, आईस्क्रीम उत्पादकांकडून मोठी मागणी
मे महिन्यात वाढता उन्हाळा, थंडपेय, शीतपेय उत्पादकांची राहणारी हमखास मागणी, लग्नसराई, यात्रा जत्रा, आईस्क्रीम उत्पादकांकडून साखरेला मोठी मागणी राहते. साखरेच्या खपाचे दिवस सध्या सुरू असून पहिल्या आठवड्यातच आणखी मागणी वाढेल.