यशोदा कदम उर्फ अक्का यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोनहिराचे चेअरमन मोहनराव कदम यांना पत्नीशोक

सांगली: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे माजी आमदार आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ‘अक्का’ या नावाने अत्यंत सुपरिचित असलेल्या यशोदा कदम यांच्या निधनामुळे सोनसळ आणि चिंचणीसह संपूर्ण पलूस-कडेगाव मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.


यशोदा कदम यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत गेले. आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह कदम कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.


यशोदा अक्का या भारती विद्यापीठाचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वहिनी होत. कदम कुटुंबातील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते त्यांनी आयुष्यभर अत्यंत आस्थेने जपले. मोठ्या कुटुंबातील नाती सांभाळताना त्यांनी सर्वांना प्रेम, माया आणि जिव्हाळ्याचा भक्कम आधार दिला. त्यांच्या जाण्याने कदम कुटुंबाने आपल्या घरातील एक प्रेमळ, कर्तव्यदक्ष आणि मायेची सावली देणारे मातृतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे.


माजी आमदार मोहनराव कदम यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचालीत यशोदा कदम नेहमीच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. कदम कुटुंबाच्या संपूर्ण राजकीय-सामाजिक प्रवासातील पडद्यामागचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. दुपारी सोनसळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशोदा कदम यांच्या पश्चात पती माजी आमदार मोहनराव कदम, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम, मुलगी शोभाताई महाडिक, नातू कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, आदित्य कदम, हर्षवर्धन कदम यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »