नाशिक साखर कारखान्याचे कुलूप अखेर निघणार

नाशिक : नऊ वर्षापासून बंद असलेला आणि नाशिक (), सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) उद्या (ता. २) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
शनिवारी सायंकाळी पाचला कारखान्याचे प्रवेशद्वार उघडून नूतनीकरणाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सतर्फे देण्यात आली. ४ तालुके व १७ हजार सभासदांच्या नाशिक साखर कारखाना नऊ वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे बंद होता. खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नूतनीकरणाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होत आहे. खासदार संभाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, जिल्हा बँकेचे प्रशासक अरुण कदम, नासाकाचे अवसायक रामेंद्रकुमार जोशी, बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत.
कारखान्याचे गेट उघडण्याचा प्रश्न निकाली
साधारण २०१३ – १४ आर्थिक वर्षापासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना कधी सुरू होतो, याकडे ऊस उत्पादकांचे डोळे लागले होते. गेल्या सात ते आठ वर्षापासून जिल्हा बँक वेळोवेळी विविध निविदा प्रसिद्ध करून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने हा कारखाना पुन्हा सुरू होतो की नाही ही चिंता सर्वत्र पसरली होती.
कारखाना सुरू करण्यास कोणी पुढे येत नाही. हे बघून शेतकरी व कामगारांचे हित लक्षात घेऊन खासदार गोडसे यांनी आपले व्यावसायिक सहकारी यांना सोबत घेत कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले. त्यानुसार दीपक बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स यांची निविदा पात्र ठरल्याने बँकेने त्यांच्यासोबत करार करून ३० मार्चला कारखान्याची मालमत्ता दीपक बिल्डर यांच्याकडे देण्याचा करार होऊन उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदविला गेला. त्यामुळे कारखान्याचे गेट उघडण्याचा प्रश्न निकाली निघाला.