एफआरपी देण्यात ८९ कारखाने ठरले शंभर नंबरी; किसनवीर, जयलक्ष्मी, राजगड रेड झोनमध्ये

आवडल्यास ही बातमी शेअर करा

महाडिक शुगर अव्वल – 120%

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत कशी कामगिरी ठरली, याची माहिती साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे. तब्बल ८९ साखर कारखान्यांनी शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक एफआरपी रक्कम अदा केली आहे; तर तीन साखर कारखाने रेडझोनमध्ये, म्हणजे सर्वात कमी एफआरपी देणारे ठरले आहेत. त्यात भुईंज (सातारा) येथील किसन वीर स. सा. कारखाना, निवळी (ता. उस्मानाबाद) येथील जयलक्ष्मी शुगर आणि भोरचा (जि. पुणे) राजगड सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. त्यांना पुढील हंगाम जड जाऊ शकतो.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी, २०२१-२२ या गाळप हंगामात साखर कारखान्यांची एफआरपी कामगिरी कशी राहिली याची सविस्तर माहिती जारी केली आहे.
शंभर टक्के एफआरपी रक्कम देणाऱ्या ८९ कारखान्यांमध्ये ५० खासगी आणि ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. ८० ते ९९ टक्के एफआरपी देणारे शंभर कारखाने आहेत. त्यात माळेगाव, बारामती ॲग्रो, विलास सहकारी, छत्रपती, सह्याद्री आदी कारखान्यांचा समावेश आहे. ४५ साखर काखान्यांनी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे.
ज्यांनी ८० टक्के किंवा त्याहून कमी एफआरपी रक्कम वितरित केली, असे ८ कारखाने असून त्यात वैद्यनाथ, संत दामाजी, विठ्ठल रिफाइंड आदींचा समावेश आहे. परळीच्य् वैद्यनाथकडे १५.४ कोटींची एफआरपी थकबाकी आहे.
महाडिक शुगर अव्वल
राधानगरी येथील महाडिक शुगर ॲग्रो रिलायबल शुगर अँड डिस्टिलरी पॉवर लि. या खासगी साखर कारखान्याने १२० टक्के एफआरपी अदा केल्याने तो राज्यात अव्वल ठरला आहे. त्याने सुमारे ५० कोटी रुपये अदा केले. तर सर्वाधिक एफआरपी (चारशे कोटींपेक्षा अधिक ) देणारे सात कारखाने आहेत.
मात्र एफआरपीची संख्यात्मक सर्वाधिक रक्कम अदा करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तब्बल ५८२.५ कोटी रुपये दिले. तरीही ही रक्कम एकूण रकमेच्या ९० टक्केच आहे. आणखी दहा टक्के देणे बाकी आहे. पाचशे कोटींपेक्षा अधिक देणी देणाऱ्यांमध्ये जरंडेश्वर, इंडिकॉन, जवाहर शेतकरी यांचा समावेश आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »