इथेनॉलवर धावली लॅम्बोर्गिनी; थायलंडमधील प्रयोगाने वेधले जागतिक वाहन उद्योगाचे लक्ष

आवडल्यास ही बातमी शेअर करा
E85 इंधनावर रेसिंग कारची यशस्वी कामगिरी; हरित इंधनाच्या नव्या क्षमतांचा प्रत्यय

बँकॉक : प्रतिनिधी

इथेनॉल हे केवळ पेट्रोलमधील मिश्रणापुरते मर्यादित न राहता उच्च कार्यक्षमतेच्या (High Performance) वाहनांसाठीही प्रभावी इंधन ठरू शकते, याचा प्रत्यय थायलंडमधील एका अनोख्या प्रयोगातून आला आहे. Regreen-Excel कंपनीच्या ‘E-max’ तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल प्रकल्पातून उत्पादित E85 इंधनावर चालणारी लॅम्बोर्गिनी रेसिंग कार विविध मोटरस्पोर्ट स्पर्धांमध्ये यशस्वीरीत्या सहभागी होत असून, या प्रयोगाने जागतिक वाहन आणि इथेनॉल उद्योगाचे लक्ष वेधले आहे.

थायलंडमधील एका इथेनॉल उत्पादकाने कसावा (Cassava) आणि धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनासाठी Regreen-Excel विकसित ‘E-max’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याच प्रकल्पात निर्मित E85 इथेनॉल इंधनावर लॅम्बोर्गिनी रेसिंग कारचे यशस्वी रूपांतर करण्यात आले. ही कार सध्या विविध रेसिंग स्पर्धांमध्ये धावत असून, इथेनॉल हे उच्च ऑक्टेन क्षमतेचे, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधन असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, E85 इंधन वापरल्यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. इंधनाचे अधिक परिणामकारक ज्वलन, पारंपरिक जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणे आणि कार्बन उत्सर्जनात घट यांसारखे महत्त्वाचे फायदे मिळतात. याशिवाय कसावा आणि धान्य यांसारख्या नूतनीकरणक्षम कृषी पिकांपासून इंधन निर्मितीला चालना मिळत असल्याने शाश्वत ऊर्जा व्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे.

Regreen-Excel EPC India Limited ने सांगितले की, कंपनी धान्य, कसावा, मळी (Molasses), साखरेचा पाक (Sugar Syrup) तसेच इतर नूतनीकरणक्षम कच्च्या मालावर आधारित ऊर्जा-कार्यक्षम आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनासाठी ‘E-max’ तंत्रज्ञान विकसित करत आहे. इथेनॉल उत्पादन प्रकल्पांपासून ते इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांपर्यंत हरित ऊर्जा साखळी अधिक सक्षम करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.

ऊर्जा सुरक्षा, स्वच्छ पर्यावरण आणि उच्च कार्यक्षमतेच्या वाहतुकीच्या दृष्टीने इथेनॉलचा वाढता वापर भविष्यात वाहन उद्योगासाठी नवे पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. थायलंडमधील हा प्रयोग त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »