‘भोगावती’ च्या २७०० सभासदांचे सभासदत्व रद्द

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या २७०० भागधारकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हे सभासद कोर्टात आव्हान देणार आहेत.
२०१२ ते २०१५ या कालावधीत असणाऱ्या राष्ट्रवादी शेकापच्या सत्ताधारी मंडळीनी ३,९१२ इतके सभासद वाढवले होते; पण पुन्हा काँग्रेसची सत्ता येताच हे सभासद रद्द करावे असा ठराव दोन सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. शेवटी २०१९ च्या सभेत हा ठराव आला होता.
संचालक मंडळाने या सभासदांना तत्काळ रद्द न करता त्यांना तीन वेळा नोटीस पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत कळविले होते. ३,९१२ सभासदांपैकी १,२२९ सभासदांनी सभासद पूर्ततेबाबत लागणारी कागदपत्रांची पूर्तता केल्याने हे सभासद पात्र झाले आहेत.
अपात्र सभासद कोर्टात गेल्यास संभाव्य निवडणुकीचे भवितव्य काय असणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, दोन हजार सभासदांचे सभासद रद्द करताना त्यांना कोणत्या आधारे रद्द केले याची पारदर्शकता समोर येणे गरजेचे होते. भोगावतीचे अनेक सभासद अंगठे बहाद्दर आहेत. त्यांना निकष माहीतच नाहीत. कारखान्याची सर्व गावांमध्ये यंत्रणा आहे. या यंत्रणेमार्फत या सभासदांपर्यंत पोहोचून कागदपत्रांची पूर्तता सभासद कायम करावेत, मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केले आहे.