ई-२० धोरणावरून वाद : ग्राहकांवर वाढता आर्थिक ताण

महागाई वाढण्याची शक्यता; ‘टीम भारत’चा इशारा
पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल धोरणाला विरोध वाढत असून, या धोरणामुळे देशातील ग्राहकांवर सर्वात मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप ‘टीम भारत’ संघटनेने केला आहे. या संदर्भात संबंधित तज्ज्ञांची चौकशी करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
संघटनेच्या मते, ई-२० इंधनाचा वापर अनिवार्य केल्यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये घट होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना अधिक इंधन खर्च करावा लागणार असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे. तसेच, या धोरणामुळे महागाईतही वाढ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
‘टीम भारत’ने यासंदर्भात “इंधन स्वातंत्र्य” हा मुद्दा उपस्थित करत, ग्राहकांना कोणते इंधन वापरायचे याची निवड करण्याचा अधिकार असावा, असे स्पष्ट केले. मात्र, सरकारकडून या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पर्यावरणीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या धोरणाचा कोणताही ठोस अभ्यास न करता ते लागू करण्यात आले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे वाहनांच्या इंजिनवर होणारे परिणाम, इंधन कार्यक्षमता आणि दीर्घकालीन खर्च याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित तज्ज्ञांची चौकशी करण्याची मागणी करत, या धोरणाचा पुनर्विचार करावा, असे ‘टीम भारत’ने म्हटले आहे. तसेच, देशभरात जनजागृती मोहीम राबवून या मुद्द्यावर आवाज उठवण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.






