साखर उद्योगावर पुण्यात दोन दिवस विचारमंथन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डीएसटीएचे ७१ वे वार्षिक अधिवेशन ८ व ९ ऑगस्ट रोजी होणार ; देशभरातील साखर तज्ज्ञ, उद्योगजक आणि धोरणकर्त्यांची उपस्थिती

पुणे : देशातील साखर उद्योग, इथेनॉल, जैवऊर्जा आणि अत्याधुनिक साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींना दिशा देणारे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) – DSTA चे ७१ वे वार्षिक अधिवेशन आणि ‘शुगर एक्स्पो-२०२६’ 8 आणि 9 ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल येथे होणार आहे.

या अधिवेशनात देशभरातील साखर उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, तंत्रज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार असल्याने साखर क्षेत्रातील हे वर्षातील सर्वात महत्त्वाचे अधिवेशन मानले जात आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन ८ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होईल. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी अर्थ व गृहमंत्री तथा आमदार जयंत पाटील असतील, तर विधान परिषदेचे सदस्य आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी तसेच द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. कुंभार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

अधिवेशनामध्ये देशातील साखर उद्योगासमोरील सध्याची आव्हाने, उत्पादन खर्च, ऊर्जा कार्यक्षमता, इथेनॉल निर्मिती, जैवऊर्जा, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आधुनिक यंत्रसामग्री आणि उद्योगातील नव्या तांत्रिक संधी यावर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
त्याचबरोबर ‘शुगर एक्स्पो-२०२६’ मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उद्योगातील नवकल्पनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ते शनिवार आणि रविवार असे दोन दिवस खुले असेल.

याच अधिवेशनात डीएसटीएचे २०२६ चे विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून साखर उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

डीएसटीएचे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून, उपाध्यक्ष एस. डी. बोखारे (महाराष्ट्र), एम. के. पटेल (गुजरात) आणि सी. जी. माने (कर्नाटक) आणि त्यांचा चमू अधिवेशनाची जय्यत तयारी करत आहेत.

साखर उद्योगातील धोरणात्मक बदल, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या क्षेत्रातील तज्ज्ञ शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यासाठी देशभरातून शोधनिबंध आले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »