‘ऊस तोडणी समस्या आणि उपाय’, १७ ला महत्त्वाची कार्यशाळा

पुणे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील साखर कारखान्यांसाठी ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ‘डीएसटीएआय’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे हॉल येथे १७ मे २०२३ या दिवशी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत संपन्न होईल. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अभ्यासू साखर आयुक्त शेखर गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीएसटीएचे प्रमुख शहाजी भड असतील, तर ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक अजित चौगुले, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुनील मासाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर अभ्यासू शेतकरी कृषिरत्न डॉ. संजीव माने, नामवंत ऊस विशेषज्ञ आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, वरिष्ठ प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ. दशरथ ठवाळ, उगार शुगरचे डॉ. जगदीश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. यांत्रिक तोडणी प्राधान्याने केलेले साखर कारखान्यातील प्रतिनिधी त्यांचे अनुभव विशद करणार आहेत.
मजुरांच्या समस्येमुळे मागील ३-४ वर्षापासून ऊस तोडणी वेळेवर होत नाही किंवा शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून यांत्रिकीकरण आणि ऊस तोडणी मशीनच्या सहाय्याने करण्याकडे कारखान्यांचा कल वाढत आहे. या मशीनमुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जात आहे. तसेच पाचटापासून जमिनीत सेंद्रिय खत उपलब्ध होऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होत आहे.
अशी तोडणी करत असताना येणाऱ्या समस्या त्यावर उपाय आणि पुढील वाटचाल या विषयावर शिवाजीनगर (पुणे) येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन मार्फत ४ राज्यातील साखर कारखान्याच्या व्यवस्थापनातील प्रमुख जसे चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी ऊस विकास अधिकारी, ऊस तोडणी मशीन कंपन्यांचे प्रतिनिधी एक दिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे ऊस तोडणी मशीन विकसित केलेल्या व सध्या कारखान्यात प्राधान्याने वापरणाऱ्या कंपन्यांचे जसे शक्तिमान, न्यू हॉलंड, एसबी रिसेलर- कोल्हापूर या कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे अनुभव व ऊस तोडणी साठी पुढील वाटचाल या विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत.
तसेच या कंपन्यानी त्यांचे मशीन व संबंधित अवजारांचे प्रदर्शनही कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केले आहे. डीएसटीए पुणे, साखर आयुक्त पुणे, साखर संघ मुंबई, विस्मा साखर संस्था पुणे आणि माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे या सर्व आयोजकाकडून साखर कारखान्यातील या विषयावर काम करणाऱ्या सर्वांना आग्रहाने निमंत्रित करण्यात आले आहे.