ऊस क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण काळाजी गरज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस क्षेत्र म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित कारखानदारीची प्रगती करायची असेल, तर यांत्रिकीकरणाला पर्याय नाही, असा सूर ‘डीएसटीएआय’च्या वतीने आयोजित तज्ज्ञांच्या कार्यशाळेत उमटला.

‘डीएसटीएआय’ पुणे यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी शिरनामे हॉल कृषी महाविद्यालय पुणे येथे एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली.

महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि उत्तर कर्नाटक येथील मुख्य शेती अधिकारी, तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक या कार्यशाळेत उपस्थित होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते आणि डी एस टी ए आय पुणे चे अध्यक्ष शहाजीराव भड यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच डॉ. श्री सुनील मासाळकर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

श्री. गायकवाड यांनी, उद्घाटनपर भाषणात महाराष्ट्र राज्य गेल्या दोन वर्षांमध्ये साखर उत्पादनात आणि ऊस क्षेत्रात जागतिक विक्रम केला असून दोन नंबरचे स्थान पटकावले आहे हे आपणा सर्वांना भूषणावह आहे, असे उदगार काढले.
‘वाढलेले ऊस क्षेत्र आणि त्यास आलेल्या ऊस तोडीच्या समस्या या फार भेडसावत असून मजुरांची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत गेली, त्यास पर्याय यांत्रिकीकरण म्हणजेच हार्वेस्टर मशीनने ऊस तोडणे होय’, असे ते म्हणाले.

dsta pune

या कार्यशाळेत 125 कारखान्याचे सुमारे दोनशे प्रतिनिधी, तसेच विविध संस्थातील तंत्रज्ञ असे एकूण 300 जणांची उपस्थिती होती.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ऊस तोडीतील अग्रेसर ऊस हार्वेस्टर कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यात खास करून एस बी रिसेलर-कोल्हापूर, तीर्थ ऍग्रो शक्तिमान आणि न्यू हॉलंड यांनी आपल्या अत्याधुनिक मशीनचे प्रदर्शन करून कार्यशाळेमध्ये संशोधनात्मक सादरीकरण केले.
दिवसभराच्या कार्यशाळेत तांत्रिक चर्चासत्रास बी .बी. ठोंबरे (अध्यक्ष विस्मा) यांनी तसेच दुसऱ्या चर्चासत्रात डॉ. योगेंद्र नेरकर (माजी कुलगुरू कृषी विद्यापीठ राहुरी) तसेच तिसऱ्या चर्चासत्रात संजय खताळ (एम डी, साखर संघ महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये डी एस टी ए आय पुणे शेती समितीचे समन्वयक कृषिरत्न डॉ. संजीव माने, सह समन्वयक डॉ. सुरेश पवार आणि माजी प्राचार्य डॉ दशरथ ठवाळ यांनी प्रमुख भूमिका बजावली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »