जयसिंगपूरच्या ऊस परिषदेकडे महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकऱ्यांचे लक्ष!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जयसिंगपुरात उद्या २५ वी ऊस परिषद; तयारी अंतिम टप्प्यात

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. १०) जयसिंगपूर येथे होणाऱ्या २५ व्या ऊस परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या परिषदेत उसाच्या पहिल्या उचलीची किती मागणी केली जाणार, याकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर दुपारी दोन वाजता परिषद होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी, महिला आघाडी आणि कर्नाटकातील रयत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेट्टी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्यांत दौरे करून शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, साखरेला प्रतिकिलो किमान विक्री मूल्य ५० रुपये आणि सी हेवी मोलॅसिसला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, या मागण्यांसाठी हुबळी येथील केंद्रीय मंत्री जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी (दि. १२) संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत साखर आणि मोलॅसिसच्या दरांबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा असून, तिच्याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

परिषदेसाठी वाहनतळांची व्यवस्था

परिषदेला येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष शंकर नाळे यांनी दिली.

सांगलीकडून येणारी वाहने : सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि हॉटेल शांभवीसमोरील मैदान.
शिरोळकडून येणारी वाहने : दसरा चौक.
कोल्हापूरकडून येणारी वाहने : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर.

परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »