रेणुकादेवी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यावर भर : आमदार विलास भुमरे

पैठण : श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यावर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. कारखान्याच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
कारखान्याची सध्याची प्रतिदिन १,२५० टन गाळप क्षमता ६,५०० टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन असल्याचे भुमरे यांनी सांगितले. मागील गळीत हंगामात कारखान्याने २,०५,४६६.०३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले, अशी माहिती त्यांनी दिली. कारखान्याच्या अडचणीच्या काळात सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
विस्तारीकरणाबरोबरच १०० केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी आणि २० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचेही भुमरे म्हणाले. येत्या गळीत हंगामात प्रतिदिन २,१०० ते २,२०० मेट्रिक टन गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्यात देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक तांत्रिक सुधारणांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
या सभेला संचालक मंडळातील सदस्य, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.






