जमीन विक्री आणि कर्जावरून ‘यशवंत’च्या सभेत चर्चा; आधुनिक प्रकल्पाला बहुमताचा पाठिंबा

लोणी काळभोर, पुणे : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्री, नवीन साखर प्रकल्पासाठी प्रस्तावित कर्ज आणि सभासद व कामगारांच्या थकीत देण्यांवरून जोरदार चर्चा झाली. अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (२७ सप्टेंबर) झालेली सभा सुमारे तीन तास चालली.
सभासदांनी यापूर्वी विकलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले. नवीन प्रकल्पासाठी कर्ज घेण्याची गरज काय, तसेच थकीत देणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांनी केली. कारखान्याची सद्यस्थिती आणि तो पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व्यवस्थापनाने सभेत मांडले.
सभेच्या अखेरीस उर्वरित ७० एकर जमिनीच्या विक्रीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व परवानग्या पूर्ण करण्याचा निर्णय झाला. आधुनिक प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावालाही बहुमताने पाठिंबा देण्यात आला. थकीत देण्यांबाबत तज्ज्ञ, सभासद आणि कामगार यांच्यात समन्वय साधण्याचे ठरले.






