‘कादवा’चे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात; गाळप क्षमता ३५०० टीसीडी होणार

जानोरी/दिंडोरी : शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा आणि ऊस पळवापळवीचे संकट टाळता यावे, यासाठी कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता २५०० वरून ३५०० टीसीडीपर्यंत वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
गाळप क्षमता वाढल्याने अधिक ऊस वेळेत गाळता येईल आणि उत्पादन खर्च कमी होण्यासही मदत होईल, असे शेटे म्हणाले. कारखान्याच्या वाढत्या क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेताना शेटे म्हणाले की, २००७ मध्ये जबाबदारी स्वीकारली तेव्हा कारखाना आर्थिक अडचणीत होता. त्यानंतर गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आली आणि इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यात आला. भविष्यात सीएनजी व खतप्रकल्प उभारण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
सभेत यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या वेळेबाबतही चर्चा झाली. ऊस अद्याप पुरेसा परिपक्व झालेला नसल्याने हंगाम १५ दिवस ते एक महिना उशिरा सुरू करावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी ठरावाद्वारे मांडली. इतर सभासदांनीही विविध प्रश्न उपस्थित केले.
यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.






