मागील हंगामातील प्रतिटन १६३ रुपयांचा भावफरक द्या!

गाळप सुरू करण्यापूर्वी यंदाचा ऊसदर जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
कळमनुरी : वाकोडी येथील शिरूर साखर कारखान्याने मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन १६३ रुपयांचा भावफरक द्यावा आणि यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना प्रशासनाला निवेदन दिले.
निवेदनानुसार, मागील हंगामात नॅचरल शुगर कारखान्याने उसाला प्रतिटन २,९१३ रुपये दर दिला होता, तर शिरूर साखर कारखान्याने प्रतिटन २,७५० रुपये दर दिला. नॅचरल शुगरप्रमाणे दर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही दरांतील १६३ रुपयांचा फरक अदा करावा, अशी त्यांची मागणी आहे.
अत्यल्प पावसामुळे यंदा ऊस पिकाची स्थिती बिकट असून उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बैठक घेऊन गाळप सुरू होण्यापूर्वी योग्य दर जाहीर करावा, असे निवेदनात म्हटले आहे. मागण्या मान्य न करता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी वाकोडी, डोंगरगाव नाका, गंगापूर, केडगाव, सुकळी आणि गोळे बाजार परिसरातील शेतकरी उपस्थित होते.






