शुभ्र साखरेसाठीचा आग्रह सोडावा : माहुली


पुणे : साखर उद्याेगासाठी सल्फरची फार मोठ्या प्रमाणात गरज लागत नसली, तरी जनतेने पांढऱ्या शुभ्र साखरेचा आग्रह धरणे सोडावे, त्यामुळे साखर उत्पादनावरील खर्च तर काही प्रमाणात कमी होईलच, शिवाय आरोग्यासाठी अधिक चांगले राहील, असे प्रतिपादन राजारामबापू सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र माहुली (सीए) यांनी केले.
साखरेला पांढरा शुभ्र रंग आणण्यासाठी सल्फरचा वापर होतो. त्यासाठी सरकारने प्रमाण ठरवून दिले आहे, त्याच प्रमाणात कारखाने सल्फरचा वापर करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सल्फरचे प्रमाण आणखी कमी करून, ‘सल्फरलेस’ साखर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ऊस गळीत हंगामावेळी सल्फरची टंचाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात तथ्य असले, तरी यापुढे लोकांनी पांढऱ्या शुभ्र साखरेचा आग्रह सोडून द्यायला हवा. ते सर्वांच्या आरोग्यासाठी आणखी चांगले राहील. जगभर आता फिक्कट तपकिरी (ब्राऊन) रंगाची साखर वापरण्याकडे कल वाढू लागला आहे, असे माहुली म्हणाले.
टंचाईमुळे यंदा सल्फरचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र साखर उद्योग त्यावर मात करेल, असा विश्वासही श्री. माहुली यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले की, आखातातील युद्ध स्थिती, तसेच लांबलेला युक्रेन-रशिया संघर्ष याचा सल्फर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आगामी हंगाम सुरू व्हायला आणखी वेळ आहे; नेमकी किती टंचाई निर्माण होऊ शकते, याचा अंदाज साखर कारखाने घेत आहेत. त्यानुसार ते नियोजन करतील.

या अडवणीवर मात करण्यासाठी साखर कारखाने योग्य नियोजन करत आहेत, त्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होणार नाही, असा विश्वास ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी व्यक्त केला.






