ऊस गाळप हंगामाला हिरवा कंदील; २१० साखर कारखान्यांना परवानगी

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयाकडून सुरू करण्यात आली आहे. यंदा गाळप परवान्यासाठी एकूण २१० कारखान्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आवश्यक तयारी पूर्ण असलेल्या कारखान्यांना १५ ऑक्टोबरपूर्वीही गाळप सुरू करता येणार असल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी स्पष्ट केले.
गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण २१० साखर कारखान्यांनी अर्ज दाखल केले. या अर्जांवरील परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत राज्याचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, ही तारीख निश्चित केल्यामुळे त्यापूर्वी गाळप सुरू करण्यास बंदी आहे, असा अर्थ घेऊ नये, असे डॉ. कोलते यांनी सांगितले. कारखान्यांची तयारी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना आधीही हंगाम सुरू करता येणार आहे.
पावसाअभावी काही भागांत उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत शेतकरी संघटनांकडूनही विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरीहित आणि कारखान्यांची तयारी विचारात घेऊन गाळप सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.






