अपुऱ्या पावसाचा फटका; मराठवाड्यात साखर उत्पादन घटणार?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे उसाच्या लागवडीवर गंभीर परिणाम झाला आहे. विभागातील उसाचे सरासरी क्षेत्र सुमारे ३ लाख २४ हजार हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ४३ हजार हेक्टरवर, म्हणजेच सरासरीच्या अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगामात साखर उत्पादन तब्बल ८६ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जूनपासून मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. नद्या-नाले, विहिरी, बोअरवेल, शेततळी तसेच लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने उसाची नवीन लागवड जवळपास ठप्प झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकेही करपू लागली असून विभागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.उसाचे क्षेत्र घटल्यामुळे २०२६-२७ च्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना पुरेसा ऊस मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. याचा साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि मराठवाड्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागातील प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्येही लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात ऊस आणि साखर उत्पादनासमोरील संकट आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






