देशातील साखर उत्पादन 32.8 दशलक्ष टनांपर्यंत घटणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘इस्मा’चा अंदाज

नवी दिल्ली : यंदा साखरचे उत्पादन ३२.८ दशलक्ष (३२८ लाख) टनांपर्यंत घटेल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने व्यक्त केला आहे. यापूर्वी 34 दशलक्ष टन (340 लाख टन) उत्पादनाचा अंदाज होता.

ISMA चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांच्या मते, महाराष्ट्रातील उशिरा पाऊस आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे उत्पादनात किंचित घट झाल्यामुळे सध्याच्या साखर विपणन वर्षासाठी साखर उत्पादनाचा आमचा अंतिम अंदाज ३२.८ दशलक्ष टन आहे.

ते म्हणाले, “महाराष्ट्रात उत्पादन थोडे कमी झाले आहे, एकूण उसाचे क्षेत्र पूर्वीएवढे किंवा काहीसे अधिक राहील, असा आमचा अंदाज होता. परंतु उशिरा पाऊस आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे,”.

तथापि, झुनझुनवाला यांनी नमूद केले की, ‘भारतातील साखरेचा एकूण ताळेबंद आशादायकच राहील असे दिसत आहे. बर्‍याच कंपन्यांनी इथेनॉल उत्पादनात गुंतवणूक केली आहे, 4 दशलक्ष टन साखर इथेनॉलकडे वळवली आहे. त्यामुळे इथेनॉलचे एकूण उत्पादन चांगले होत आहे; एकूण पुरवठा चांगला आहे. तसेच साखर बाजारातील दर देखील चांगल्या पातळीवर आहेत, मात्र एफआरपीचा विचार करता, साखर उद्योगाच्या अपेक्षनुरूप नक्कीच नाहीत.’

श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की, भारतीय निर्यात मार्चपर्यंत झाली होती आणि आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली वाढ आणि किरकोळ देशांतर्गत किमत वाढ यामुळे भारतीय साखर उद्योगाला मदत होत आहे.

“भारतीय शुगर मिल्सनी मार्चपर्यंत आपली सर्व निर्यात पूर्ण केली होती. आमची जास्तीत जास्त निर्यात प्रत्यक्षात मार्चपर्यंत होते,” असे ते पुढे म्हणाले.

इथेनॉलसाठी 4.5 दशलक्ष टन उसाच्या मोलॅसिसचा वापर लक्षात घेऊन जानेवारीमध्ये ISMA संस्थेने एकूण 340 लक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता. तथापि, मागील साखर विपणन वर्ष 2021-22 मध्ये, इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर केल्यानंतर साखरेचे उत्पादन 358 लाख टन इतके होते.

ISMA संस्थेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम सुमारे 10.5 दशलक्ष टन साखर उत्पादनावर संपला आहे, जो आमच्या आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 2022-23 च्या साखर विपणन वर्षासाठी 101 लाख टनांच्या आधीच्या अंदाजावरून 105 लाख टनांवर सुधारित करण्यात आले आहे.

तथापि, कर्नाटकातील साखरेचे उत्पादन चालू साखर विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये ५६ लाख टनांच्या आधीच्या अंदाजावरून ५७ लाख टनांपर्यंत वाढले आहे. ISMA ने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, सप्टेंबरमध्ये संपलेल्या साखर विपणन वर्ष 2022-23 मध्ये साखरेचे उत्पादन 15 एप्रिलपर्यंत 6 टक्क्यांनी घटून 31.1 दशलक्ष टन झाले आहे, याचे मुख्य कारण महाराष्ट्रातील कमी उत्पादन आहे.

मात्र, मागील साखर विपणन वर्षाच्या याच कालावधीत साखरेचे उत्पादन ३२.८७ दशलक्ष टन होते. सरकारने साखर विपणन वर्ष 2022-23 साठी 6 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे, जी मागील साखर विपणन वर्ष 2021-22 मध्ये सुमारे 11 दशलक्ष टन होती, जी आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »