किल्लारी कारखाना सुरू होण्याचे श्रेय फडणवीस यांना: आ. पवार

लातूर- अडचणींचा सामना करत किल्लारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न होत असून गेल्या चार वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आज प्रत्यक्षात साकारलेले आहे. मात्र खरे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
आमदार पवार म्हणाले, की किल्लारी साखर कारखान्याची १३ कोटींची बोली होती २०० कोटीं मूल्य असलेला साखर कारखाना १३ कोटींमध्ये जाणार होता. मात्र हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा या दृष्टीने आपण प्रयत्न केला. किल्लारी कारखान्याच्या या प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण विरोध करण्यापेक्षा सहकार्य करणारे अदृश्य हात कितीतरीपटीने अधिक होते. यावेळी हा कारखाना ९४ कोटींचे देणे असल्याने अनेक बँकेने कर्ज देताना हात वर केले. यामध्ये कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मदत केली.
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा असल्याचे सांगून यंदाच्या गळीत हंगामात १ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे आमदार पवार म्हणाले.
यावेळी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याची विधीवत पूजन आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या पत्नी शोभाताई यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सुभाष जाधव यांनी तर समारोप माजी संचालक शेषराव मोहिते यांनी केला.
याप्रसंगी संतोष मुक्ता, गुंडाप्पा बिराजदार, हभप दतात्रय पवार गुरुजी, पार्वतीबाई दत्तात्रय पवार, सौ. शोभाताई अभिमन्यू पवार, प्रकाश पाटील, काकासाहेब मोरे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, गोविंद भोसले, जयपाल भोसले, प्रा. सुधीर पोतदार, आदीसह अन्य मान्यवर कारखान्याचे प्रशासक, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.