ई-२० पेट्रोलमुळे इंजिन बिघाडाच्या तक्रारी नाहीत : केंद्राचा दावा

नवी दिल्ली : ई-२० (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत, असा स्पष्ट दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत केला.
ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, इंजिनवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतामध्ये २००९ पासून इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे प्रमाण वाढवत नेण्यात आले असून सध्या देशभरात ई-२० इंधनाचा वापर वाढत आहे. सरकारने आवश्यक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक बदल करून हा वापर प्रोत्साहित केला आहे.
वाहन उत्पादक कंपन्यांनीही ई-२० इंधनास अनुरूप अशी इंजिने विकसित केली आहेत. तसेच, अनेक कंपन्या ई-२० वापरणाऱ्या वाहनांवर वॉरंटी देत असून ग्राहकांनी कोणतीही चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉल मिश्रित इंधनामुळे प्रदूषणात घट, परकीय चलनाची बचत आणि शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.





