उसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर द्या : किसान सभा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊसदराच्या मागणीसाठी १ ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा मेळावा

कोल्हापूर : उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, तसेच साखरेबरोबरच मळी, बगॅस, सहवीज, इथेनॉल आणि प्रेसमड या उपपदार्थांपासून कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होईल, अशी माहिती गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये ऊस हे शेतकरी कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. ऊस पिकासाठी जमीन, पाणी, भांडवल आणि मोठ्या प्रमाणात श्रम खर्च करावे लागतात. मात्र साखर व इतर उपपदार्थांपासून कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, असे फोंडे म्हणाले.

रंगनाथन समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा आणि साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन ६,५०० रुपये दर द्यावा, ही मेळाव्यातील प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »