दुष्काळाच्या छायेत ऊसतोडणी मजूर दाखल!

निवाऱ्याच्या उभारणीला वेग;
पोटापाण्यासाठी कारखाना परिसरात धाव
पुणे : ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नसतानाच साखर कारखान्यांच्या परिसरात ऊसतोडणी मजूर दाखल होऊ लागले आहेत. गाळप हंगाम सुरू झालेला नसला, तरी कारखान्यांकडून पूर्वतयारी सुरू आहे. दुसरीकडे, गावाकडील दुष्काळाची चिंता सोबत घेऊन आलेल्या मजुरांनी हंगामी वास्तव्यासाठी राहुट्या उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
दरवर्षी गाळप हंगामाच्या तोंडावर ऊसतोडणी आणि वाहतुकीसाठी मजूर कारखाना परिसरात येतात. यंदाही पोटापाण्यासाठी स्थलांतर केलेल्या कुटुंबांची निवाऱ्याच्या उभारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे गावाकडील शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेची चिंता त्यांना सतावत आहे.
राज्यातील बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीतील पाणी वापरावर निर्बंध आल्याने पिके अडचणीत आली आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीचा ऊस उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने साखर कारखान्यांकडून गाळप हंगामाच्या तयारीला वेग देण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यासह दुष्काळग्रस्त भागांतून आलेल्या मजुरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावाकडे गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. उभी पिके वाया गेली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. पुढील महिन्यात पाऊस पडेल, या आशेवर खरीप आणि रब्बीच्या पेरण्या केल्या; मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने मजुरीसाठी गाव सोडावे लागल्याची व्यथा त्यांनी मांडली.
हंगाम संपल्यानंतर पुन्हा गावाकडील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याची जाणीव या कुटुंबांना आहे. तरीही उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणीचा आधार घेत त्यांनी कारखाना परिसरात तात्पुरता संसार उभारण्यास सुरुवात केली आहे.






