कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर; पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रमाणीकरणानंतर कर्जखात्यात रक्कम जमा होणार; सहकार आयुक्त दीपक तावरे यांची माहिती

पुणे : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सुमारे एक लाख १५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधितांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि एकूण थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

जवळच्या सेवा केंद्रावर प्रमाणीकरण करा

यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल.

या यादीतील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. संबंधित कर्जाची थकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीची असून, त्यानंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या खात्यांनाही दिलासा

काही शेतकऱ्यांची ३१ मार्च रोजीची कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार संबंधित कर्जखाती निरंक करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पात्र लाभार्थ्यांपैकी मृत शेतकरी तसेच बोटांचे ठसे जुळत नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठीही स्वतंत्र मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांतील लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »