गाळप हंगाम सुरू करण्यासाठी कारखानदारांवर केंद्राचा दबाव : राजू शेट्टी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : दिवाळीच्या काळात देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकार साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मात्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याची टीकाही त्यांनी केली. बुधवारी सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरू झाल्यास गाळपासाठी ऊस कारखान्यांपर्यंत पोहोचू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. कारखाने लवकर सुरू करण्यासाठी केंद्र सरकार इतका दबाव का आणत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदारांशी संघर्ष होत असला, तरी ऊस उत्पादकांच्या हितासाठी केंद्र सरकारविरोधात कारखानदारांसोबत लढण्याची तयारी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. शेतकरी आणि कारखानदारांनी एकत्र येऊन ऊसदराच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी संघर्ष करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ऊसदरासाठी कारखानदारांशी गेल्या वर्षी संघर्ष झाला होता. यंदा भांडण होण्यापूर्वीच शेतकरी आणि कारखानदारांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे, असे ते म्हणाले. कारखानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्यास ऊस उत्पादकांचे प्रश्नही मार्गी लागतील, असे मत त्यांनी मांडले.

दिवाळीत साखरेची टंचाई होण्याच्या भीतीने केंद्राने १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कारखानदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

कोयनेतील राखीव पाणी सिंचन व पिण्यासाठी देण्याची मागणी

सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कोयना धरणात वीजनिर्मितीसाठी राखून ठेवलेले पाणी सिंचन आणि पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारकडून पाण्याच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन होत नसल्याने वेळोवेळी उपसाबंदी केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते, अशी टीका त्यांनी केली. या प्रश्नावर प्रसंगी संघर्ष करावा लागला, तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »