दौंड शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ११ ऑक्टोबरला थेट मुलाखती

पुणे : आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लिमिटेडच्या साखर कारखान्यात प्रशासन-सुरक्षा, इंजिनिअरिंग, को-जनरेशन आणि उत्पादन विभागांतील विविध कायम व हंगामी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांसाठी रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कारखाना स्थळी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रशासन-सुरक्षा विभागात सेफ्टी ऑफिसर या कायम पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी औद्योगिक सुरक्षेतील प्रगत पदविका अर्थात एडीआयएसआय आणि अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे.
इंजिनिअरिंग व को-जनरेशन विभागात टर्नर, वेल्डर, खलाशी, पंप/फॅब्रिकेशन फिटर, वायरमन-बी, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, डीसीएस ऑपरेटर (व्हीसीपी) आणि डीसीएस ऑपरेटर (बॉयलर) ही कायम पदे भरली जाणार आहेत. तसेच क्रेन ऑपरेटर या हंगामी पदासाठीही उमेदवारांची निवड केली जाणार आहे. संबंधित पदांनुसार आयटीआय किंवा दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
उत्पादन विभागात पॅनमन (रिफायनरी प्लँट) आणि इव्हॅपोरेटर/व्हॅक्युपॅन मेट ही कायम पदे उपलब्ध आहेत. लॅब केमिस्ट, शुगर हाऊस क्लार्क, असिस्टंट पॅनमन (रिफायनरी प्लँट), सल्फिटेशन मेट, ऑलिव्हर मेट/व्हॅक्युम फिल्टर मेट आणि सेंट्रीफ्युगल ऑपरेटर या हंगामी पदांसाठीही भरती होणार आहे.
लॅब केमिस्ट पदासाठी बी.एस्सी. रसायनशास्त्र, तर शुगर हाऊस क्लार्क पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. उत्पादन विभागातील अन्य पदांसाठी पदानुसार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, पॅन बॉयलिंग कोर्स आणि संबंधित यंत्रणा चालविण्याचा अनुभव अपेक्षित आहे.
क्रेन ऑपरेटर आणि खलाशी पदांची प्रात्यक्षिक चाचणी १० ऑक्टोबरला
क्रेन ऑपरेटर व खलाशी पदांच्या उमेदवारांनी शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रात्यक्षिक चाचणीसाठी उपस्थित राहावे. त्यानंतर त्यांना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, बायोडाटा, सध्याचा व अपेक्षित पगार यांचा तपशील, मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतींचा एक संच घेऊन दौंड शुगर प्रा. लिमिटेड, आलेगाव, ता. दौंड, जि. पुणे येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. संबंधित पदावर साखर कारखान्यात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार आहे.




