डॉ. आंबेडकर साखर कारखाना गाळपासाठी सज्ज!

धाराशिव : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६–२७ गाळप हंगामासाठी २३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि त्यांच्या पत्नी स्नेहलता कडू पाटील यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी अरविंद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. निलेश गायकवाड पाटील यांनी केले. कारखान्याच्या २३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना त्यांनी ऊस गाळप हंगामातील विविध आव्हानांचा उल्लेख केला. ऊस उपलब्धता कमी असो वा अधिक, सभासद आणि बिगरसभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याची भूमिका सातत्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले. अरविंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व सभासदांच्या विश्वासावर संस्था कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या गाळप हंगामासाठी २५ मोठे ट्रॅक्टर, १६० मिनी ट्रॅक्टर आणि ६० हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळपासाठी सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रमुख अतिथी संभाजी कडू पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कारखाना चांगल्या पद्धतीने चालविल्याबद्दल व्यवस्थापनाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात अरविंद गोरे यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेतला. पाटबंधारे विभागाकडून पाणी मिळाले नसतानाही उपलब्ध पाण्यावर कारखाना चालवून अडचणींवर मात केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी पाण्यात प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारे, चित्रा गोरे, संचालक, ऊस उत्पादक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






