ऊस गाळपासाठी मराठवाड्यातील ३४ कारखाने सज्ज!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर १८ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील ३४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील १६ आणि नांदेड विभागातील १८ साखर कारखान्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ सहकारी व आठ खासगी, तर नांदेड विभागातील सहा सहकारी आणि १२ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत.

साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ऑनलाइन क्रशिंग लायसन्स प्रणालीद्वारे कारखान्यांना गाळप परवान्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्यभरातून २०२६-२७ च्या हंगामासाठी ६६ सहकारी आणि ६१ खासगी अशा एकूण १२७ साखर कारखान्यांचे प्रस्ताव ऑनलाइन दाखल झाले आहेत. संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांकडून प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर परवाने दिले जाणार आहेत.

उसाच्या टंचाईची शक्यता

यंदाच्या गाळप हंगामात उसाची उपलब्धता तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गाळप परवाना मिळाल्यानंतर अधिक क्षमतेचे साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. परिणामी, मराठवाड्यात ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये तीव्र स्पर्धा आणि उसाची पळवापळवी होण्याची चर्चा साखर उद्योगात सुरू झाली आहे.

गाळपाचे नियोजन करण्याचे निर्देश

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे आणि अहवालांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित कारखान्यांनाही परवानगी दिली जाईल. उपलब्ध उसाचा विचार करून गाळपाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश कारखान्यांना देण्यात येणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »