दालमियाच्या सीबीजी प्रकल्पाची साखर आयुक्तांकडून पाहणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पोर्ले तर्फ ठाणे : केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) योजनेला दालमिया साखर कारखान्याच्या प्रकल्पामुळे जिल्ह्यात बळ मिळणार आहे. कारखान्याच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या प्रतिदिन १३ टन क्षमतेच्या सीबीजी प्रकल्पाची राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आणि विभागीय साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांनी पाहणी केली.

कारखान्यातील प्रेसमड, स्पेंट वॉश यांसारख्या टाकाऊ पदार्थांपासून या प्रकल्पात सीबीजीची निर्मिती केली जाणार आहे. पारंपरिक इंधनाला पर्यावरणपूरक पर्याय देणारा हा प्रकल्प आगामी चार महिन्यांत पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश डॉ. कोलते यांनी दिले.

यावेळी अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. उत्कृष्ट साखर उतारा, प्रभावी ऊर्जा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि कार्यक्षमतेबद्दल मिळालेल्या पुरस्कारांची दखल घेत त्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.

पाहणीवेळी युनिट हेड संतोष कुमार, निर्मिती युनिट हेड श्रीधर गोसावी, एचआर हेड सुहास गुंडके, मुख्य अभियंता शिवप्रसाद पंडित, जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील, संभाजी भोसले आणि मनीष अग्रवाल उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »