एआयमुळे ऊस शेतीत क्रांती; कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची माहिती
पुणे : राज्यातील साखर उद्योगासमोरील पाणीटंचाईचे वाढते संकट आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम लक्षात घेता, ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरत आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी पाण्यात अधिक आणि गुणवत्तापूर्ण ऊस उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
मांजरीतील व्हीएसआयच्या मुख्यालयात हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावरील परिणाम या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा व हार्वेस्टर ऑपरेटर प्रशिक्षणाचे उद्घाटन मंगळवारी (दि.28) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. अशोक कडलग, राजकोट येथील तीर्थ अॅग्रोटेकचे उपाध्यक्ष विश्वसोमनवार आदी उपस्थित होते. यामध्ये ४३ साखर कारखान्यांमधील १७३ मुख्य व ऊसविकास अधिकारी, कृषी पर्यवेक्षक तसेच १५ प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.
ते म्हणाले की, पारंपरिक शेती पद्धतींऐवजी तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. एआयच्या मदतीने शेतातील मातीची गुणवत्ता, आर्द्रता, हवामानातील बदल आणि पिकांची वाढ यांचे अचूक विश्लेषण करता येते. त्यामुळे पाण्याचा आणि खतांचा योग्य प्रमाणात वापर करून उत्पादन वाढवता येते. याशिवाय, ड्रोन तंत्रज्ञान आणि सेन्सरच्या मदतीने शेतातील परिस्थितीवर सतत नजर ठेवता येते. कीड व रोगांचा प्रारंभिक टप्प्यातच शोध घेऊन नियंत्रण करणे सोपे होते. परिणामी उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या माध्यमातून शाश्वत शेती आणि साखर उद्योगाचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. वळसे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास भविष्यात ऊस शेती अधिक सक्षम, उत्पादक आणि पर्यावरणपूरक होईल.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले , बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादन व गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून साखर कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम व्यापक आणि प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी, साखर कारखाने आणि संशोधन संस्थांनी समन्वयाने कार्य केल्यास या आव्हानांवर निश्चितपणे मात करता येईल, असा विश्वास आहे.






