दुष्काळाचे आव्हान; ऊस उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न : राजेश टोपे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

तीर्थपुरी : दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, समर्थ कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजीमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक २ (सागर), तीर्थपुरी येथील २०२६–२७ च्या १६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. ६) उत्साहात झाला. गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी टोपे बोलत होते.

टोपे म्हणाले की, मराठवाड्यासह कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळाचे सावट आहे. नदी, तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाला असून अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण भरल्यामुळे कालव्याच्या पाण्याचा काही भागांना दिलासा मिळाला असला, तरी इतर भागांतील परिस्थिती चिंताजनक आहे.

खरीप पिकांचे नुकसान झाले असून दुष्काळाचा परिणाम ऊस पिकावरही झाला आहे. त्यामुळे उसाचे हेक्टरी उत्पादन नेहमीपेक्षा कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यंदा २० ते २५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

महागाई, मशिनरीच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, दुरुस्ती खर्च आणि पॅकिंग साहित्याच्या किमती यांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. तरीही ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी स्पष्ट केले. जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मागील हंगामातील काही शेतकऱ्यांची ऊसबिले अद्याप मिळाली नसल्याचे सांगत, ऊस गाळपासाठी दिलेल्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन टोपे यांनी केले.

यावेळी कारखान्याला उत्कृष्ट ऑनलाइन साखर विक्री, साखर उद्योग गौरव आणि सर्वोत्तम ऊस विकास यांसाठी विविध पुरस्कार मिळाल्याची माहिती देण्यात आली. युनिट क्रमांक २ ला ‘सर्वोत्कृष्ट आर्थिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार’ जाहीर झाल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी कारखान्यामार्फत उपलब्ध होणारे गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि पोटॅश खताचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »