इथेनॉलमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा : शेखर गायकवाड
अग्रणी नदी पुनर्जीवनातील योगदानाबद्दल ‘अग्रणीभूषण’ पुरस्काराने गौरव
कवठेमहांकाळ : उसाची वाढती मागणी आणि मका व अन्य पिकांपासून इथेनॉल निर्मितीला मिळणारी चालना यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची संधी आहे. साखरेची मागणी वाढल्यास उसाला चांगला दर मिळू शकतो, असा विश्वास अतिरिक्त महासंचालक तथा माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.
अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अग्रणी नदीच्या पुनर्जीवनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अग्रणी पाणी फाउंडेशन आणि अग्रणी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने गायकवाड यांना ‘अग्रणीभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गायकवाड म्हणाले, इथेनॉल निर्मितीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. भविष्यात महिला बचत गटांनाही इथेनॉल स्टोव्हच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राबविलेल्या अग्रणी नदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. या प्रकल्पांतर्गत ५५ किलोमीटर नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले, तसेच ३५ बंधारे उभारण्यात आले. या कामामुळे मृतप्राय झालेल्या अग्रणी नदीला नवसंजीवनी मिळून ती बारमाही प्रवाहित झाली. परिणामी नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल झाला, असे त्यांनी सांगितले.
या कार्यात राजेंद्र सिंह यांच्यासह सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. दुष्काळाच्या काळात लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करणे, तसेच मिरज जिल्हा रुग्णालयातील सुविधांच्या सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी भानुदास गावडे होते. अग्रण धुळगावच्या विकासासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि अग्रणी नदीकाठच्या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






