साखर उद्योगासाठी केंद्राची लवकरच ‘गोड बातमी’

मुख्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला दिलासा देणारी बातमी लवकरच म्हणजे, आठ-दहा दिवसांत केंद्राकडून मिळणार आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील साखर कारखान्यांना ठोस आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या एका आठवड्यात यासंदर्भात केंद्र सरकारचे धोरण जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शाह यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक, खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, खा. रणजित सिंह निंबाळकर आदींचा समावेश होता.
कोरोनाच्या काळामुळे राज्यातील साखर कारखानदारी डबघाईस आल्याचा दावा करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साखर कारखान्यांना कर्ज घेण्यासाठी मार्जिन मनीमध्ये वाढ करण्यात यावी, ही प्रमुख मागणी आहे.
याचप्रमाणे साखर कारखानदारांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे. यामुळे कारखानदारांना कर्जाची परतफेड करणे सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे साखर कारखानदारांना इथेनॉलपासून वीजनिर्मितीसाठी को-जनरेशनची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
