वि. का. सेवा सोसायट्या बनणार ‘ॲग्री बिझनेस सोसायट्या’

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्राथमिक सोसायट्यांना (वि. का. से. सो.) केंद्राचे बळ मिळणार असून, त्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतरित होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘आणखी एक मागणी आम्ही केली आहे, ती म्हणजे साखर निर्यात कोट्याबाबत. महाराष्टाला समुद्रकिनाराला लाभल्याने आपण अन्य राज्यांपेक्षा अधिक निर्यात करू शकतो, त्यामुळे निर्यात कोटा वाढवून मिळावा, या मागणीवरही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.’’
‘तसेच सहकाराचा सुरुवात गावपातळीपासून करणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. गावाचे अर्थकारण या सोसायट्यांवर बऱ्यापैकी अवलंबून असतो. . गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे त्या थोड्याशा कमजोर झाल्या होत्या. त्यांच्या बळकटीकरणासाठी व्यापक कार्यक्रम सहकार मंत्र्यांनी हातामध्ये आहे.’’
फडणवीस म्हणाले, ‘या सोसायट्या बळकट तर होतीलच, शिवाय एक प्रकारे त्यांचे ऍग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तन होईल आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल. यासाठी महाराष्ट्राने पुढाकार, असे अमित शाह यांनी सूचवले असून, आपल्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊ, असे सांगितले आहे.’’