नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा : कृषिमंत्री भरणे

करमाळ्यातील शेतकऱ्यांची ऊसदर तातडीने जाहीर करण्याची मागणी
करमाळा : तालुक्यातील ऊस, केळी आणि इतर नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे तातडीने करण्याचे आदेश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. करमाळ्यातील शेतकऱ्यांनी इंदापूर येथे त्यांची भेट घेऊन पिकांच्या नुकसानीचा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप या पिकांचे पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ऊस, केळी व अन्य पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीची दखल घेत भरणे यांनी तहसीलदार शिल्पा ठोंबरे यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, चिखलठाण येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेतली. राज्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामासाठी उसाचा दर तातडीने जाहीर करावा, या मागणीचे निवेदन त्यांनी सादर केले.
वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून उसाला योग्य दर द्यावा आणि ऊसबिलांची रक्कम वेळेत अदा करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दराबाबत लवकर स्पष्टता मिळावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
कृषिमंत्र्यांच्या भेटीवेळी अविनाश सरडे, महादेव मोरे, इनुस सय्यद, सचिन गावडे, योगेश सरडे, अशोक घोगरे यांच्यासह चिखलठाण व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.






